

टोकियो : जपानमधील एअर डॅन्शिन सिस्टीम्स या कंपनीने अशी एक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी विकसित केली आहे, ज्यामुळे भूकंप आल्यानंतर घर जमिनीपासून सुमारे 3 सेंटीमीटर उंच हवेत उचलले जाईल. या तंत्रज्ञानात एअर बॅग सिस्टम वापरण्यात आली आहे, जी भूकंपाची जाणीव होताच काही सेकंदांत सक्रिय होते.
जमिनीला कंपन जाणवू लागल्यावर, या यंत्रणेतील सेन्सर्स अॅक्टिव्ह होतात आणि अत्यंत वेगाने यात हवा संकुचित केली जाते. त्यामुळे घराच्या पायाखाली असलेली विशेष एअर बॅग फुगते आणि संपूर्ण घर थोडे उंचावले जाते. यामुळे जमिनीच्या हलण्याचा किंवा कंपनाचा परिणाम घरावर फारसा होणार नाही. भूकंप थांबताच हे घर परत जसे होते तसे जमिनीवर येते. या तंत्रज्ञानाची 2021 मध्ये यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली होती. अशा प्रकारची प्रणाली जिथे घरांचे पुनर्निर्माण कठीण आहे, तिथे हा सुरक्षेचा उत्तम उपाय ठरू शकते.