
टोकियो : भविष्यवाणी म्हटलं की नॉस्त्रेदेमस आणि बाबा वेन्गा यांचीच नावं घेतली जातात; मात्र त्यांच्याशिवाय अजून एक नाव अलीकडे चर्चेत आले आहे, जपानच्या मँगा (ग्राफिकल कॉमिक्स) कलाकार रायो तातसुकी (Ryo Tatsuki) यांचे. 1999 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘द फ्युचर आय सॉ’ या कॉमिक पुस्तकात मार्च 2011 मध्ये जपानमध्ये एका भीषण नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी करण्यात आली होती जी अचूक ठरली. आता त्यांनी जुलैमध्ये मोठ्या भूकंपाचे भाकीत वर्तवले आहे आणि त्यामुळे अनेक लोक पर्यटनासाठीचे बुकिंग कॅन्सल करीत आहेत!
मार्च 2011 मध्ये जपानच्या उत्तर तोहोकु प्रांतात 9.0 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात प्रचंड लाटा (त्सुनामी) उसळल्या आणि फुकुशिमा डायची न्यूक्लिअर प्लांटचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेला 1986 मधील चेर्नोबिलनंतरची सर्वात मोठी अणु दुर्घटना मानली जाते. 2021 मध्ये या मँगा मालिकेचा अंतिम भाग प्रकाशित झाला ‘द फ्युचर आय सॉ : कम्प्लिट व्हर्जन’ त्यात तातसुकी यांनी भाकीत केले की 2024 च्या जुलैमध्ये जपान आणि फिलिपीन्सच्या दरम्यान समुद्राच्या तळाशी मोठी भेग पडेल, ज्यामुळे 2011 पेक्षा तीनपट मोठ्या लाटा उसळतील.
जुलै जसजसा जवळ येतो आहे, तसतसा जपानच्या पर्यटन क्षेत्रावर याचा परिणाम दिसू लागला आहे. अनेक देशांतील पर्यटक, विशेषतः चीन, थायलंड, हाँगकाँग आणि व्हिएतनाम येथील, जुलै महिन्यासाठी केलेली जपान यात्रा रद्द करत आहेत. सोशल मीडियावर या भविष्यवाणीबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तातसुकी या त्यांच्या स्वप्नांतून भविष्य पाहतात असे त्यांचे चाहते मानतात. त्यांनी प्रिन्सेस डायना, सिंगर फ्रेडी मर्क्युरी यांच्या मृत्यूबाबत, तसेच कोव्हिड-19 महामारीबाबत देखील पूर्वी भाकीत केलं असल्याचा दावा आहे.