

टोकियो : उन्हाळा म्हणजे थंडगार आईस्क्रीमचा मौसम! सर्व वयोगटांतील लोकांचा हा एक आवडता पदार्थ आहे आणि प्रत्येकाची एक खास फेव्हरेट चवसुद्धा असते. कोणाला मँगो, कोणाला व्हॅनिला; पण आता आम्ही तुम्हाला अशा एका आईस्क्रीमबद्दल सांगणार आहोत, जे सामान्य नाही, तर जगातील सर्वात महागडे आईस्क्रीम आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्नुसार, जपानच्या सेलाटो ब्रँडने हे खास आईस्क्रीम तयार केले असून, त्याची किंमत आहे तब्बल 8,73,400 जपानी येन, म्हणजेच सुमारे 5.2 लाख रुपये आहे. इतक्या पैशांत तब्बल सहा स्कूटी विकत घेता येतील!
या आईस्क्रीममध्ये वापरले गेले आहेत अतिशय दुर्मीळ आणि महागड्या घटकद्रव्यांचा संगम. त्यामध्ये व्हाईट ट्रफलचा समावेश होतो. इटलीच्या अल्बा भागातील हे अत्यंत दुर्मीळ आणि महागडी ट्रफल आहे, ज्याची किंमत प्रती किलो 12 लाख रुपयांहून अधिक आहे! या आईस्क्रीममधील पार्मिजियानो रेग्गीयानो हा इटालियन चीजचा एक खास प्रकार, जो चव वाढवतो. जपानी साके बनवताना उरलेला भाग ‘साके ली’, जो या आईस्क्रीममध्ये खास स्वादासाठी वापरला जातो.
सेलाटो ब्रँडने जपानी आणि युरोपियन पदार्थांचे फ्यूजन करून हे युनिक आईस्क्रीम तयार केले. यासाठी त्यांनी ओसाका येथील प्रसिद्ध फ्यूजन रेस्टॉरंट ‘रिवी’चे मुख्य शेफ ताडायोशी यामादा यांची मदत घेतली. टेस्टिंग सेशनमध्ये सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी सांगितले की, व्हाईट ट्रफलचा सुगंध खूप मोहक आहे, तो खाण्याची उत्सुकता वाढवतो. पार्मिजियानो रेग्गीयानोमुळे फळांचा गोडसर स्वाद जाणवतो. साके ली स्वादात एक अनोखा समृद्ध अनुभव देते. या आईस्क्रीमची रेसिपी बनवण्यासाठी दीड वर्षे लागली.