Space Exploration : जेम्स बेब टेलिस्कोपने शोधला आकाशगंगेतील 'ताऱ्यांचा खजिना'

नासाच्या टेलिस्कोपने टिपले विलोभनीय दृश्य
Space Exploration
जेम्स बेब टेलिस्कोपने शोधला आकाशगंगेतील 'ताऱ्यांचा खजिना'
Published on
Updated on

वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांनी आता एक अनोखा शोध लावला आहे. तारकांच्या विश्वात उघडलेल्या एका विशाल खजिना पेटीसारखी दिसणारी ही एक अद्‌भुत खगोलीय रचना आहे; पण यात सोने-दागिने नसून डझनभर नवजात सूर्य दडले आहेत. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपलेल्या या नव्या छायाचित्राने ‘कॅरिना नेब्युला’मधील वायू आणि धुळीच्या रंगीबेरंगी ढगाचे अप्रतिम दृश्य समोर आणले आहे. या भागाला ‘ट्रेझर चेस्ट’ हे अगदी सार्थ नाव देण्यात आले असून ही आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेतील सर्वाधिक तारे निर्माण होणाऱ्या समृद्ध भागांपैकी एक आहे.

पृथ्वीपासून सुमारे ७,५०० प्रकाशवर्षे दूर दक्षिण गोलार्धातील ‘कॅरिना’ तारकासमूहात हा नेब्युला पसरलेला आहे. सुमारे २६० प्रकाशवर्षे रुंदीच्या या भागात आपल्या आकाशगंगेतील सर्वात महाकाय तारे आणि हजारो नवजात ‘प्रोटोस्टार्स’ वसलेले आहेत. जेम्स वेबच्या नजीक-अवरक्त कॅमेऱ्याने (NIRCam) या धुळीच्या पदरामागे सुमारे ७० तरुण ताऱ्यांचा समूह शोधला आहे. यातील सर्वात मोठा तारा अत्यंत दुर्मीळ मानला जाणारा ‘O-टाईप’ तारा आहे. हा तारा सूर्यापेक्षा सुमारे १९ पट मोठा, अत्यंत तेजस्वी आणि कमी आयुष्य असणारा आहे. ट्रेझर चेस्ट ही एक ‘कॉमेटरी ग्लोब्युल’ रचना आहे. म्हणजेच याचा पुढील भाग घनदाट-गडद असून पाठीमागे लांब शेपूट पसरलेली आहे. लाकडी पेटीचे झाकण उघडून आतून प्रकाश बाहेर पडावा, तसा याचा देखावा दिसतो.

खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या ताऱ्यांच्या समूहाचे वय सुमारे १३ लाख वर्षे (१.३ दशलक्ष वर्षे) आहे, तर काहींच्या मते हे वय अवघे १ लाख वर्षे असू शकते. यातील अनेक तारे अजूनही त्यांच्या जन्मदात्या वायू आणि धुळीच्या वेढ्यात आहेत. काळाच्या ओघात, या ताऱ्यांमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे हे धुळीचे आवरण हटेल आणि लपलेले तारे उघड्या डोळ्यांनी पाहता येतील. या रचनेपासून ३९ प्रकाशवर्षे अंतरावर ‘एटा कॅरिने’ हा या नेब्युलातील सर्वाधिक तेजस्वी तारा आहे. १९ व्या शतकात या ताऱ्याचा मोठा स्फोट झाला होता. ‘एटा कॅरिने’ प्रणालीतील सूर्यापेक्षा १०० पट मोठा तारा आणि शेजारील ‘ट्रम्पलर १६’ तारा समूह यामधून येणारे तीव्र वारे आणि प्रारण ट्रेझर चेस्टच्या ढगांना विशिष्ट आकार देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news