James Webb Space Telescope | जेम्स वेब टेलिस्कोपने शोधली सर्वात जुनी कृष्णविवरांची जोडी

James Webb Space Telescope |
James Webb Space Telescope | जेम्स वेब टेलिस्कोपने शोधली सर्वात जुनी कृष्णविवरांची जोडी
Published on
Updated on

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी सक्रियपणे वायू आणि धूळ गिळंकृत करणाऱ्या विशालकाय कृष्णविवरांची एक अत्यंत जवळ असलेली जोडी शोधून काढली आहे. ही कृष्णविवरे जेव्हा विश्व अवघे १.३ अब्ज वर्षांचे होते, त्या काळातील असल्याचे दिसून आले आहे.

एकत्रितपणे ‘LID-1166’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन महाकाय कृष्णविवरांमध्ये एका विलीन होणाऱ्या आकाशगंगेच्या आत फक्त ४,९०० प्रकाशवर्षे (१.५ किलोपारसेक्स) इतकेच अंतर आहे. विशालकाय कृष्णविवरांच्या निर्मितीचा आणि वाढीचा टप्पा समजून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आपण पाहतो त्यापैकी बहुतांश मोठ्या आकाशगंगा इतर आकाशगंगांशी विलीन होऊन अब्जावधी वर्षांच्या कालावधीत तयार झाल्या आहेत. बहुतांश सर्वच आकाशगंगांच्या केंद्रात कृष्णविवरे असतात, त्यामुळे दोन आकाशगंगांचे विलीनीकरण झाल्यावर दोन कृष्णविवरे असलेली एक प्रणाली तयार होते. अशा ‘ड्युअल ब्लॅक होल’ प्रणाली सुरुवातीच्या विश्वात सामान्य असाव्यात असा अंदाज आहे. तथापि, हे ब्लॅक होल्स गर्द वायू आणि धुळीच्या थरांमध्ये गाडले गेल्यामुळे आणि एकमेकांच्या खूप जवळ असल्याने त्यांना स्वतंत्रपणे पाहणे आतापर्यंत कठीण जात होते.

‘इंटरनॅशनल जेमिनी ऑब्झर्व्हेटरी/NSF NOIRLab’ च्या खगोलशास्त्रज्ञ ह्येवॉन सु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन ‘arXiv’ वर प्रसिद्ध केले आहे. विश्वाच्या सुरुवातीच्या इतिहासातील एकमेकांच्या सर्वात जवळ असलेल्या ‘ड्युअल ब्लॅक होल’ प्रणालीचा हा शोध आहे. या प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांच्या टीमने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणि चिलीतील रेडिओ टेलिस्कोपचा समूह असलेल्या ‘अटाकामा लार्झ मिलिमीटर/सबमिलिमीटर एरे’ (ALMA) चा वापर केला. हे संशोधन ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशनासाठी स्वीकारण्यात आले आहे.नासाच्या गॉडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील अस्ट्रोफिजिसिस्ट अॅना त्रिंदादे फाल्काव यांनी म्हटले आहे की “या शोधाचे वैशिष्ट्य म्हणजे, बिग बँगनंतर अवघ्या १.३ अब्ज वर्षांनंतरच्या प्रणालीमध्ये ही दोन कृष्णविवरे वाढताना आणि परस्परांशी संवाद साधताना आपण पाहू शकत आहोत.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news