

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शनि ग्रहाच्या वातावरणात एका चार-अक्षरी तार्याच्या आकाराच्या संरचनेच्या वर काही विचित्र आणि गडद ‘मण्यांसारख्या’ आकृतींचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या या आश्चर्यकारक संरचना नेमक्या काय आहेत, याबद्दल त्यांना अजूनही खात्री नाही.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आपल्या नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ या उपकरणाचा वापर करून या असामान्य आकृतींचा शोध घेतला. शनिच्या उत्तर ध्रुवावरील षटकोनी वादळाच्या वर असलेल्या वायूच्या वातावरणाचा अभ्यास करताना या आकृत्या दिसल्या. सुरुवातीला, खगोलशास्त्रज्ञांना या वातावरणीय स्तरांमध्ये इन्फ्रारेड स्पेक्ट्रमच्या विस्तृत पट्ट्यांमध्ये उत्सर्जन दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना त्याऐवजी गडद, मण्यांसारख्या संरचना दिसल्या. या संरचना एकमेकांपासून खूप दूर असल्या तरी त्या कदाचित एकमेकांशी जोडलेल्या आहेत. शनिच्या आयनोस्फियरमधील चार्ज्ड प्लाझ्मामध्ये त्या हळू हळू तरंगत होत्या. त्यांच्या खाली स्ट्रॅटोस्फिअरमध्ये एक असमान तार्याच्या आकाराची रचनाही आढळली. या शोधांचे निष्कर्ष ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या मासिकात प्रकाशित झाले आहेत.
ब्रिटनमधील नॉर्थम्बि—या विद्यापीठाचे खगोलशास्त्राचे प्राध्यापक टॉम स्टेलर्ड यांनी एका निवेदनात म्हटले, ‘हे निकाल पूर्णपणे अनपेक्षित होते. या संरचना पूर्णपणे अनपेक्षित आहेत आणि सध्या तरी त्या कशा तयार झाल्या, याचे स्पष्टीकरण देता आलेले नाही. ‘शनिचे षटकोनी वादळ सर्वप्रथम 1980 मध्ये नासाच्या व्हॉयेजर अंतराळयानाने शोधले. त्यानंतर, 2004 ते 2017 या काळात शनीभोवती फिरणार्या कॅसिनी अंतराळयानाने याचे सूक्ष्म तपशीलवार छायाचित्रण केले.
हा 18,000 मैल (29,000 किलोमीटर) रुंद असलेला सहा बाजूंनी तयार झालेला प्रचंड वादळ शनिच्या पृष्ठभागावर फिरत असतो आणि तो साधारणपणे दर 10 तासांनी एक पूर्ण प्रदक्षिणा करतो. शास्त्रज्ञांना असे वाटते की हा षटकोनी आकार ग्रहाच्या ध्रुवाभोवती फिरणार्या जेट स्ट्रीममुळे तयार झाला असावा आणि शनिच्या वातावरणातील वायूंच्या गुणधर्मांमुळे त्याला हा विशिष्ट आकार मिळाला असावा. तरीही, त्याला नेमका हा प्रवाह आणि आकार का मिळाला, याची अचूक कारणे निश्चितपणे माहीत नाहीत. तसेच, या षटकोनी वादळाच्या वरच्या वातावरणातील अतिशय कमी उत्सर्जनामुळे त्या भागातील वर्तनही अजून पूर्णपणे समजलेले नाही.