

वॉशिंग्टन : इंद्रधनुषी रंगांनी नटलेल्या अंतराळातून आरपार जाणारे ऊर्जेचे स्फोटक किरण... हे दृश्य पाहिल्यावर एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील महायुद्धाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, पण प्रत्यक्षात हे कोणतेही युद्ध नसून, एका नव्या विश्वाच्या जन्माचा सोहळा आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या एकाच छायाचित्रात तार्यांच्या निर्मितीचे सर्व टप्पे एकाच वेळी टिपले आहेत. ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने 'ओरायन मॉलिक्युलर क्लाऊड' मधील OMC-2 या अत्यंत दाट आणि सुंदर तारा-निर्मिती क्षेत्राचा वेध घेतला आहे. हे छायाचित्र आपल्याला एका अशा अशांत वैश्विक पाळणाघरात घेऊन जाते, जिथे वायू, धूळ आणि नवजात तारे सतत गतिमान आहेत.
रात्रीच्या आकाशामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेली ‘ओरायन नेब्युला’ (मृग नक्षत्र) ही तार्यांची सर्वात मोठी नर्सरी मानली जाते. या नक्षत्रातील तीन तार्यांच्या रचनेला ‘ओरायनची तलवार’ म्हटले जाते आणि याच भागात दक्षिण दिशेला OMC-2 हा थंड वायू आणि धुळीचा ढग स्थित आहे. येथे ‘प्रोटोस्टार्स’ म्हणजेच अद्याप पूर्ण रूप न घेतलेले अत्यंत तरुण तारे तयार होत आहेत. या संपूर्ण दृश्यात निळ्या, हिरव्या आणि पिवळ्या रंगांत चमकणारे वायू आणि धुळीचे थर पाहायला मिळत आहेत, तर काही ठिकाणी थंड धुळीचे गडद तपकिरी आणि काळे चट्टे आहेत, ज्यांनी प्रकाश पूर्णपणे अडवला आहे. या गडद ढगांच्या आत, वैश्विक कोशात लपून अद्यापही काही तार्यांची निर्मिती प्रक्रिया सुरू असण्याची शक्यता आहे.
या ढगांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे पूर्ण विकसित झालेले तारे विखुरलेले दिसतात, यात लहान नारिंगी ठिपक्यांपासून ते धुक्यातून चमकणाऱ्या मोठ्या पांढऱ्या आणि निळ्या तार्यांचा समावेश आहे. परंतु, या चित्रातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या ढगांना छेदून जाणाऱ्या फिकट, चमकणाऱ्या लाटा आणि प्रवाहांचे जाळे! जेव्हा नवजात तार्यांमधून निघणारे ऊर्जेचे कारंजे आजूबाजूच्या अवकाशातील घटकांवर आदळतात, तेव्हा अशा चमकदार कडा आणि लहरी निर्माण होतात. यामुळे या वायूच्या प्रवाहांना एक सुंदर वळणदार आकार मिळाला असून, तरुण तारे आपल्या सभोवतालच्या वातावरणाला कसा आकार देतात, हे यातून स्पष्ट दिसते.
या चित्रातील प्रत्येक जेट, कडा आणि सावली हे अवकाशातील पदार्थांच्या हालचालींचे संकेत देतात. तारे कसे तयार होतात आणि त्यांची ऊर्जा सभोवतालच्या ढगांमध्ये कसे बदल घडवून आणते, याचा अभ्यास करण्यास यामुळे खगोलशास्त्रज्ञांना मदत होणार आहे. गुरुत्वाकर्षणामुळे पदार्थ कसे एकत्र येतात, नवजात तारे कसे पेटून उठतात आणि त्यांची ऊर्जा त्यांना जन्म देणाऱ्या ढगालाच पुन्हा कसा नवा आकार देते, याचे एक गुंतागुंतीचे पण विलोभनीय रूप या चित्राने जगासमोर आणले आहे.