

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने लाँच झाल्यापासूनच अनेक नवे शोध लावलेले आहेत. अतिशय दूर अंतरांवरील खगोलांना टिपण्यासाठी ही अंतराळ दुर्बीण कार्यक्षम आहे. अशा दूरस्थ आकाशगंगांमधील अनेक प्राचीन तारेही या दुर्बिणीने टिपले आहेत. आता या दुर्बिणीने पृथ्वीपासून तब्बल 6.5 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या ‘ड्रॅगन आर्क’ या सर्पिलाकार आकाशगंगेचे निरीक्षण केले आहे. ही आकाशगंगा ब्रह्मांडाचे वय सध्यापेक्षा निम्मे असताना निर्माण झाली होती. आता या आकाशगंगेतील तार्यांचे जणू काही भांडारच या दुर्बिणीने टिपले आहे.
अशा दूरस्थ आकाशगंगांमधील तारे सहसा अधिक अंतरामुळे स्पष्ट दिसत नाहीत. मात्र ड्रॅगन आर्कमधील तार्यांचा हा भाग ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगमुळे अधिक मोठा करून पाहण्यात आला. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 1915 मध्ये आपल्या ‘थेअरी ऑफ जनरल रिलेटीव्हिटी’ या सिद्धांतात याबाबतचे भाकीत केले होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणामध्ये ड्रॅगन आर्कच्या गुंडाळलेल्या ‘शेपटी’मध्ये 44 मोठे तारे दिसून आले. हे द़ृश्य स्पष्ट पाहण्यासाठी पृथ्वीपासून 4 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या ‘आबेल 370’ या आकाशगंगांच्या समूहाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करण्यात आला. हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्समधील संशोधक फेंगवु सुन यांनी याबाबतची माहिती दिली. इतक्या दूर अंतरावरील आकाशगंगेत मोठ्या संख्येने तारे पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे 44 तारे म्हणजे ‘रेड सुपरजायंटस्’ आहेत. हे महाकाय लाल तारे ब्रह्मांडातील सर्वात मोठे तारे आहेत.