

लंडन : 25 डिसेंबर 2023 रोजी वैज्ञानिकांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने गुरू ग्रहाच्या ऑरोरावर लक्ष केंद्रित केले आणि एक आश्चर्यचकित करणारा लाईट शो टिपला. जेम्स वेबच्या इन्फ्रारेड कॅमेर्यांच्या साहाय्याने संशोधकांनी गुरूच्या प्रचंड ऑरोरामधील झपाट्याने बदलणारी वैशिष्ट्ये टिपून घेतली. 12 मे 2025 रोजी नेचर कम्युनिकेशन्स या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, या निरीक्षणांमुळे गुरूच्या वातावरणात उष्णता निर्माण होणे आणि थंड होण्याची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होऊ शकते.
‘ख्रिसमससाठी मिळालेलं हे भन्नाट गिफ्ट होतं, मी अक्षरशः स्तब्ध झालो!’ असे मत या अभ्यासाचे सहलेखक आणि यूकेमधील लीसेस्टर विद्यापीठातील ऑरोरा तज्ज्ञ जोनाथन निकोल्स यांनी एका निवेदनात व्यक्त केले. ‘आम्हाला वाटले होते की, ऑरोरा हळूहळू कमी-जास्त होईल, कदाचित पंधरा मिनिटांत; पण प्रत्यक्षात आम्ही पाहिले की, संपूर्ण ऑरोरा क्षेत्र सतत चमकत होते, काही वेळा दर सेकंदाला बदलत होते.’ ऑरोरा म्हणजे सूर्यापासून उत्सर्जित होणार्या प्रचंड ऊर्जा असलेल्या विद्युतभारीत कणांनी एखाद्या ग्रहाच्या वातावरणातील वायूशी टक्कर दिल्यामुळे निर्माण होणारी प्रकाशाची नितांत सुंदर उधळण होय.
गुरूचे प्रबळ चुंबकीय क्षेत्र हे सौर वार्यातील इलेक्ट्रॉनसारखे कण तसेच त्याच्या ज्वालामुखीने भरलेल्या चंद्र आयओवरून उत्सर्जित कण गोळा करते आणि ग्रहाच्या ध—ुवांकडे झेपावते. परिणामी, पृथ्वीवरील नॉर्दर्न लाईटस्च्या शेकडो पट जास्त प्रखर प्रकाश निर्माण होतो. या अभ्यासात, संशोधकांनी क3+ या ट्रायहायड्रोजन कॅशनद्वारे उत्सर्जित इन्फ्रारेड प्रकाशाचे निरीक्षण केले. गुरूच्या वातावरणातील हायड्रोजनला ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन भेटल्यावर हे रेणू तयार होतात. हे रेणू उष्णता बाहेर टाकण्यास मदत करतात; पण त्याचवेळी झपाट्याने हालचाल करणारे इलेक्ट्रॉन त्यांचा नाशही करतात.
आतापर्यंत पृथ्वीवरील दुर्बिणी क3+ किती वेळ टिकतो हे अचूक सांगण्यात अक्षम होत्या. परंतु, जेम्स वेबच्या निअर इन्फ्रारेड कॅमेर्याच्या साहाय्याने संशोधकांनी अपेक्षेपेक्षा अधिक बदल टिपले. त्यांनी आढळून आणले की, क3+ सुमारे दोन मिनिटे आणि तीस सेकंद टिकतो आणि त्यानंतर नष्ट होतो. यामुळे वैज्ञानिकांना हे समजण्यास मदत होईल की, हे रेणू गुरूच्या वातावरणाला थंड करण्यामध्ये किती भूमिका बजावतात.