

वेल्स : एका छोट्याशा चुकीमुळे माणसाचे आयुष्य कसे पालटू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ब्रिटनमधील जेम्स हावेल्स नामक व्यक्ती आहे. त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने चुकून कचर्यात फेकलेल्या एका हार्ड ड्राईव्हमुळे जेम्स आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होण्याऐवजी दर-दर भटकत आहे.
2013 मध्ये जेम्सने एका हार्ड ड्राईव्हमध्ये सुमारे 8,000 बिटकॉईन साठवले होते. त्यावेळी त्याची किंमत फारशी नव्हती. एके दिवशी घर साफ करताना जेम्सच्या एक्स-गर्लफ्रेंडने चुकून ही हार्ड ड्राईव्ह एका काळ्या बॅगेत भरली आणि डंपिंग ग्राऊंडमध्ये फेकून दिली. आज या 8,000 बिटकॉईनची किंमत सुमारे 5,900 कोटी ते 6,500 कोटी रुपये इतकी आहे. जेम्स गेल्या 10 वर्षांपासून न्यूपोर्ट सिटी कौन्सिलकडे कचर्याचा डेपो खोदण्याची परवानगी मागत आहे. त्याने अनेक प्रस्ताव दिले आहेत. त्याने शोधलेल्या संपत्तीतील 25 टक्के रक्कम शहराच्या विकासासाठी देण्याचे मान्य केले होते. परंतु, न्यायालयाने कचर्याचा ढिगारा खोदणे पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगत त्याची मागणी फेटाळून लावली.