

रोम : जगाच्या पाठीवर स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असणारी अनेक गावं आहेत. संस्कृत बोलणारे गाव, जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गाव, केवळ महिलांचे गाव, वयोवृद्धांचे गाव अशी अनेक गावं देश-विदेशात पाहायला मिळतात. काही गावांत तर भन्नाट नियम-कायदेही आहेत. इटलीमधील कॅलाबरीया येथील बेलाकास्ट्रोमध्ये तेथील मेयरने नागरिकांनी तत्काळ उपचारांची गरज भासेल अशा आजारांपासून दूर राहण्याचा सरकारी आदेश जारी केला आहे. एकंदरीत या गावात लोकांना आजारी पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या फतव्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. मात्र, या निर्णयामागे एक हृदयद्रावक कारण दडलेले आहे.
एका रिपोर्टनुसार, या शहराचे मेयर अँटोनियो टॉर्चिया यांनी त्यांच्या या अध्यादेशात नागरिकांना उपचाराची गरज पडू नये म्हणून धोका उत्पन्न होईल अशी कामे, अपघात किंवा कष्टाच्या कामापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मेयर टॉर्चिया यांनी या आदेशाबद्दल माहिती देताना माध्यमांना सांगितले की, ही घोषणा काही प्रमाणात उपरोधात्मक आहे; पण याचा मुख्य उद्देश आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधून घेणे हा आहे. बेलक्रास्ट्रो शहराची लोकसंख्या सुमारे 1,200 आहे. तसेच येथे अर्ध्याहून अधिक लोक हे 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत. विशेष बाब म्हणजे ते आजारी पडले तर त्यांच्या उपचारासाठी दूर दूरपर्यंत रुग्णालयाची कुठलीही सोय नाही. या गावापासून जवळचा अपघात आणि आपत्कालीन विभाग सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे. या विभागापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता किंवा साधने उपलब्ध नाहीत.
तसेच गावातील आरोग्य केंद्र हे कामाचे तास संपल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी बंद असते. कॅलाब्रिया हा दुर्गम भाग असून येथे राहाणार्या नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. या भागात कर्ज आणि चांगल्या व्यवस्थापनाच्या अभावामुळे 2009 पासून 18 रुग्णालये बंद झाली आहेत. यामुळे नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. आपण जर अत्यावश्यक सेवा पुरवल्या नाहीत तर ही शहरे, ही गावे येत्या 10 वर्षांत मरतील. स्थानिक रहिवाशांनी मेयरने काढलेल्या आदेशाला पाठिंबा दिला आहे. प्रादेशिक अधिकार्यांनी वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेली समस्या या निर्णयामुळे प्रभावीपणे मांडली जात असल्या नागरिकांचे म्हणणे आहे.