World’s Narrowest Car | जगातली सर्वात अरुंद कार बनवण्याचा विश्वविक्रम

इटलीतील मेकॅनिकचा ‘कार’नामा; गिनिज बुकमध्ये नोंद
 World’s Narrowest Car |
World’s Narrowest Car | जगातली सर्वात अरुंद कार बनवण्याचा विश्वविक्रम
Published on
Updated on

रोम : कारच्या विश्वात दररोज वेगवेगळे डिझाईन आणि अजब मॉडेल्स पाहायला मिळतात, पण इटलीतील एका मेकॅनिकने केलेल्या ‘कार’नाम्याने सर्वांनाच थक्क केले आहे. इटलीतील मेकॅनिक आणि फियाट कारचा चाहता अँड्रिया माराजीने पहिल्या पिढीतील जुनी फियाट पांडा कार मध्यभागी कापून जगातली सर्वात अरुंद आणि चालवता येण्याजोगी कार तयार केली आहे. या अनोख्या कारचे नाव ‘Panda Per Uno’ (म्हणजेच ‘एका व्यक्तीसाठी पांडा’) असे ठेवण्यात आले आहे. ऑटोमोबाईल जगतासाठी मोठी बातमी म्हणजे या अजब कारची ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्‌ २०२७’ या पुस्तकात नोंद झाली आहे.

फियाट कंपनीने १९८० ते २००३ या काळात तब्बल ४५ लाख पांडा कार तयार केल्या होत्या. इटलीमध्ये या जुन्या कारची एक वेगळीच क्रेझ आहे. अँड्रिया हा दरवर्षी पांदिनो शहरात होणाऱ्या ‘पांडा ए पांदिनो’ या कार फेस्टिव्हलशी जोडलेला आहे. या शोमध्ये काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या ध्यासातून त्याला फियाट पांडा कापून तिची रुंदी थेट ५०.२ सेंटिमीटर (१ फूट ७.६ इंच) पर्यंत कमी करण्याची कल्पना सुचली. अँड्रियाच्या कुटुंबाचा बाग्नोलो क्रेमास्को येथे भंगारचा व्यवसाय आहे. तेथे त्याला १९९३ ची एक फियाट पांडा कार मिळाली. अँड्रियाने कारचे दरवाजे आणि साईड पॅनेल्स काढून मधला भाग कापला व पुन्हा वेल्ड केला. या कारचे ९० टक्के सुटे भाग हे मूळ कारचेच आहेत.

ही कार केवळ दाखवण्यापुरती नसून, त्यात छोटी इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी पॅक आणि स्टेअरिंग गियर बसवण्यात आला आहे. कारमधील सर्व लाईटस्‌ आणि टर्न सिग्नल्स व्यवस्थित काम करतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारचा ताशी वेग १५ किमी ठेवण्यात आला आहे, कारण रुंदी अत्यंत कमी असल्याने वळणावर ती जास्त स्थिर राहू शकत नाही. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये नाव नोंदवले गेल्यावर आनंद व्यक्त करताना अँड्रिया म्हणाला, ‘हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ही कार या गोष्टीचा पुरावा आहे की, आवड आणि सर्जनशीलतेच्या जोरावर भंगारातूनही इतिहास घडवला जाऊ शकतो.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news