वॉशिंग्टन : सध्याच्या काळात अनेक लोक मानसिक आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. अशा आजारांचे योग्य निदान व उपचार महत्वाचे ठरतात. मेंदूचे स्कॅनिंग करून मानसिक आजारांचा शोध घेणे सहज शक्य असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मेंदूसंबंधी अन्य आजारांचे निदान करणेही शक्य आहे.
या संशोधनाची माहिती ‘न्यूरॉन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेली आहे. एमआयआर स्कॅनिंगद्वारे मेंदूतील महत्त्वाच्या भागातील प्राथमिक फरक ओळखणे सहजशक्य होते. मेंदूचा विकार नसलेल्यांना या आजारांपासून दूर ठेवणे शक्य आहे. मेंदूच्या स्कॅनिंगच्या माध्यमातून मेंदूसंबंधी विकार दूर करण्याकडे पहिले पाऊल पडल्याचे वॉशिंग्टन वैद्यकीय विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन पीटरसन यांनी सांगितले. स्कॅनिंगसाठी आम्ही एमआरआय चाचणीचा विकास केला तेव्हा या चाचणीतून नेमके काय साध्य करायचे याचा विचार करणे आवश्यक होते. मात्र या चाचणीद्वारे वैद्यकीय चाचणी क्षेत्रासाठी नवी कवाडे खुली झाली आहेत. या संशोधनासाठी संशोधकांनी दहा तासांत नऊ नागरिकांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. प्रत्येकाची एक तास तपासणी केल्यानंतर संशोधकांनी वरील निदान केले. चाचणीच्या आधी व्यक्तीचे मानसिक आजार, क्षमता, वाचनाची क्षमता आणि अन्य गुणांचा विचार करण्यात आला होता. चाचणीत व्यक्तीच्या मेंदूच्या विविध भागांची, बदललेल्या घटकांची माहिती होते. त्याद्वारेच रुग्णाचा आजार शोधणेही शक्य असल्याचा शोध घेण्यात आला.