

वॉशिंग्टन : जीवाणू आणि त्यांना संक्रमित करणारे विषाणू, ज्यांना ‘फेजेस’ म्हटले जाते, यांच्यात उत्क्रांतीची एक मोठी स्पर्धा सुरू असते. मात्र, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) केलेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, हा संघर्ष जेव्हा ‘मायक्रोग्रॅविटी’मध्ये (सूक्ष्मगुरुत्वाकर्षण) होतो, तेव्हा त्याची दिशा पूर्णपणे बदलते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उत्क्रांत झालेले विषाणू हे जीवाणूंना मारण्यासाठी अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे औषधांना दाद न देणार्या जीवाणूंवर हे विषाणू उपयुक्त ठरू शकतात.
13 जानेवारी रोजी ‘झङजड इळेश्रेसू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अंतराळातील वातावरणात जीवाणू आणि विषाणूंच्या वागण्यात बदल होतो. पृथ्वीवर जीवाणू स्वतःच्या संरक्षणासाठी नव्या पद्धती विकसित करतात, तर विषाणू त्यावर मात करण्यासाठी स्वतःला बदलतात. अंतराळातील हा संघर्ष समजून घेतल्यास पृथ्वीवरील ‘अँटिबायोटिक-रेझिस्टंट’ (औषधांना दाद न देणारे) जीवाणूंवर उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनचे सहयोगी प्राध्यापक श्रीवत्सन रमण आणि त्यांच्या टीमने ‘ई-कोलाय’ जीवाणू आणि ‘टी7’ फेजेसवर प्रयोग केला. संशोधनासाठी एक गट अंतराळात (आयएसएसवर) तर दुसरा गट पृथ्वीवर वाढवण्यात आला.
अंतराळातील नमुन्यांच्या विश्लेषणातून असे दिसले की, सूक्ष्मगुरुत्वाकर्षणामुळे संसर्गाचा वेग आणि स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. अंतराळात विषाणूंना जीवाणूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करण्यास पृथ्वीच्या तुलनेत जास्त वेळ लागला. या बदलाचे मुख्य कारण म्हणजे द्रवांचे मिश्रण न होणे. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे गरम पाणी वर येते, थंड पाणी खाली जाते आणि जड कण तळाला बसतात. या सततच्या हालचालीमुळे जीवाणू आणि विषाणू एकमेकांवर आदळतात. मात्र, अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे सर्व काही तरंगत राहते. ‘विषाणू आणि जीवाणू एकमेकांवर वारंवार आदळत नसल्यामुळे, विषाणूंना जगण्याच्या संथ गतीशी जुळवून घ्यावे लागले.
त्यांना जवळून जाणार्या जीवाणूंना पकडण्यासाठी अधिक कार्यक्षम बनावे लागले,’ असे प्राध्यापक श्रीवत्सन रमण यांनी स्पष्ट केले. युरोपियन स्पेस एजन्सीच्या माजी खगोलजीवशास्त्रज्ञ निकोल कॅपलिन यांच्या मते, जर आपण हे समजून घेतले की, विषाणू जनुकीय पातळीवर अंतराळातील वातावरणाशी कसे जुळवून घेतात, तर तो अनुभव आपण पृथ्वीवरील औषधांना दाद न देणार्या जीवाणूंविरुद्ध वापरू शकतो. यामुळे ‘फेज थेरपी’च्या माध्यमातून अधिक प्रभावी अँटिबायोटिक्स विकसित करणे शक्य होईल.