Zero Gravity Place | पृथ्वीवरील ‘या’ ठिकाणी खरेच आहे शून्य गुरुत्वाकर्षण?

Zero Gravity Place |
Zero Gravity Place | पृथ्वीवरील ‘या’ ठिकाणी खरेच आहे शून्य गुरुत्वाकर्षण?
Published on
Updated on

वॉशिंग्टनः ‘झिरो ग्रॅव्हिटी’ किंवा शून्य गुरुत्वाकर्षण म्हटले की, आपल्याला लगेचच अंतराळ, अंतराळवीर आणि अवकाशात तरंगणाऱ्या वस्तू आठवतात. पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू गुरुत्वाकर्षण बलामुळे जमिनीला खिळून राहते. मात्र, पृथ्वीवर एक असे प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे गुरुत्वाकर्षणाचे नियम अपुरे पडतात किंवा शून्य होतात, असा दावा वारंवार केला जातो. हे ठिकाण म्हणजे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील प्रसिद्ध ‘मिस्ट्री स्पॉट’!

कॅलिफोर्नियातील सांता क्रूझ येथील हे ठिकाण ‘झिरो ग्रॅव्हिटी’चा अनुभव घेण्यासाठी जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. १९३९ मध्ये शोधून काढण्यात आलेले हे ठिकाण सुमारे १५० फूट व्यासाच्या वर्तुळाकार भागात पसरलेले आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना अनेक विचित्र आणि थक्क करणारे अनुभव येतात. या ठिकाणी उभे राहिल्यास लोक सामान्य कोनापेक्षा खूप जास्त पुढे किंवा मागे झुकतात, तरीही ते खाली पडत नाहीत. या रहस्यमयी भागात पाणी किंवा गोल चेंडू उताराच्या दिशेने जाण्याऐवजी टेकडीच्या चढाईच्या दिशेने वर जाताना दिसतात. येथे एकाच सपाट पृष्ठभागावर समोरासमोर उभ्या असलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाची उंची अचानक जास्त आणि दुसऱ्याची कमी दिसू लागते.

या ठिकाणाला लोक ‘शून्य गुरुत्वाकर्षण असणारे ठिकाण’ मानत असले, तरी विज्ञानाने आणि संशोधकांनी यामागील खरे रहस्य स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे शून्य गुरुत्वाकर्षण नसून एका प्रकारचा ‘ऑप्टिकल इल्युजन’ (दृष्टीचा भ्रम) आहे. येथील टेकड्या, आजूबाजूची झाडे आणि तिथल्या लाकडी इमारती विशिष्ट कोनात तयार झालेल्या आणि वाढलेल्या आहेत. जेव्हा आपण या लाकडी घरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला क्षितिज किंवा सरळ रेषेचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे तिरप्या असलेल्या वस्तू आपल्याला सरळ दिसतात आणि सरळ गोष्टी आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात चालल्याचा भास निर्माण करतात. जरी वैज्ञानिकदृष्ट्या हे ठिकाण डोळ्यांचा भ्रम असले, तरी पर्यटकांसाठी हा अनुभव अत्यंत थरारक आणि आनंददायी ठरतो. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष ‘झिरो ग्रॅव्हिटी’सारख्या वाटणाऱ्या या अद्‌भुत अनुभवाची अनुभूती घेतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news