Protein Maxing Trend | ‘प्रोटिन मॅक्सिंग’ ट्रेंड शरीरासाठी फायदेशीर आहे का?

Protein Maxing Trend |
Protein Maxing Trend | ‘प्रोटिन मॅक्सिंग’ ट्रेंड शरीरासाठी फायदेशीर आहे का?
Published on
Updated on

नवी दिल्ली : आजच्या काळात तरुणांमध्ये फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड वेगाने चर्चेत आला आहे, ज्याला ‘प्रोटिन मॅक्सिंग’ म्हटले जात आहे. पिळदार स्नायू कमावणे आणि वजन कमी करण्याच्या घाईत अनेक लोक गरजेपेक्षा जास्त प्रोटिन खाणे सुरू करतात. परंतु, प्रश्न असा उपस्थित होतो की, खरोखरच गरजेपेक्षा जास्त प्रोटिन खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे का? जाणून घेऊयात या नव्या ट्रेंडबद्दल सविस्तर...

‘प्रोटिन मॅक्सिंग’ हा सोशल मीडिया आणि फिटनेस संस्कृतीशी जोडलेला एक ट्रेंड आहे, ज्यामध्ये लोक आपल्या दैनंदिन आहारात प्रोटिनचे प्रमाण वाढवण्यावर भर देतात. स्नायूंचा विकास करणे, पोट भरलेले राहणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि फिटनेसचे ध्येय गाठणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो. या ट्रेंडअंतर्गत लोक अंडी, चिकन, मासे, दूध, दही, पनीर, डाळी, चणे, सोया, ड्रायफ्रूटस्‌ आणि प्रोटिन पावडरसारख्या पदार्थांचे अधिक सेवन करतात. तथापि, आहारात प्रोटिनचे प्रमाण वाढवणे आणि गरजेपेक्षा जास्त प्रोटिन घेणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.

प्रोटिन शरीरातील पेशींच्या निर्मितीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. स्नायूंसोबतच संप्रेरके (Hormones) आणि एन्झाईम्स (Enzymes) तयार करण्यासाठीही ते मदत करते. म्हणूनच योग्य प्रमाणात प्रोटिन घेणे हे संतुलित आहाराचा एक मुख्य भाग आहे. जे लोक नियमितपणे व्यायाम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त प्रोटिनची गरज असते. एका अहवालानुसार, नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी दररोज प्रति किलो वजनानुसार १.४ ते २.० ग्रॅम प्रोटीन उपयुक्त ठरू शकते. अति प्रोटिन सेवनाचे दुष्परिणाम आणि धोकेही आहेत. सामान्य निरोगी लोकांवर जास्त प्रोटीनच्या प्रभावाबद्दल संशोधन पूर्णपणे एकमत नाही; मात्र अतिप्रमाणात प्रोटिन घेतल्याने काही लोकांना पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.

अनेक अभ्यासांमध्ये हाय प्रोटिन डाएटमुळे पोट आणि पचनसंस्थेच्या समस्या वाढल्याचे दिसून आले आहे. जर एखाद्या व्यक्तीला आधीच किडनीचा आजार असेल किंवा इतर काही आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टर किंवा डाएटिशियनच्या सल्ल्याशिवाय हाय प्रोटीन डाएट सुरू करणे अयोग्य आहे. अशा लोकांची प्रोटिनची गरज वेगळी असते. सर्वात मोठी चूक म्हणजे लोक प्रोटिनला संपूर्ण आहाराचा पर्याय मानू लागतात. शरीराला केवळ प्रोटिनचीच नाही, तर कर्बोदके (Carbohydrates), निरोगी मेद (Healthy fats), फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचीही तितकीच गरज असते. फक्त प्रोटीन पावडर किंवा मांसाहारावर भर देण्याऐवजी प्रोटिनच्या विविध स्रोतांचा आहारात समावेश करणे जास्त योग्य ठरते. डाळी, चणे, राजमा, सोया, दूध, दही, पनीर यांसारख्या पर्यायांचा स्वतःच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार आहारात समावेश केला जाऊ शकतो. ‘प्रोटिन मॅक्सिंग’ या ट्रेंडचे डोळे झाकून अनुकरण करण्याऐवजी स्वतःच्या शरीराच्या गरजेनुसारच प्रोटिनचे सेवन करणे अधिक योग्य आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news