

केंब्रिज (अमेरिका) : आजच्या काळात लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) विशेषतः ‘ChatGPT’ वर अवलंबून असतो. मात्र, याच सवयीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘एआय’चा अतिवापर मानवी मेंदूची विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती कमी करत असल्याचे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.
प्रसिद्ध मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या मीडिया लॅबने 54 विद्यार्थ्यांवर एक विशेष प्रयोग केला. या विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. त्यांच्या मेंदूची प्रतिक्रिया तपासण्यासाठी संशोधकांनी त्यांची तीन गटांत विभागणी केली : 1. पहिला गट : ज्यांनी निबंध लिहिण्यासाठी ChatGPT ची मदत घेतली. 2. दुसरा गट : ज्यांनी माहिती शोधण्यासाठी Googleचा वापर केला. 3. तिसरा गट : ज्यांनी कोणत्याही डिजिटल साधनाची मदत न घेता स्वतःच्या बुद्धीने निबंध लिहिला.
संशोधनाचे निष्कर्ष : ChatGPT वापरणारा गट : ज्या विद्यार्थ्यांनी चॅटजीपीटीची मदत घेतली, त्यांच्यामध्ये शिकण्याच्या कौशल्याचा अभाव दिसून आला. त्यांचे लिखाण तांत्रिकद़ृष्ट्या चांगले असले, तरी भाषा आणि स्कोअरिंगच्या बाबतीत ते इतर गटांच्या तुलनेत कमकुवत ठरले. या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेंदूचा वापर कमी केल्यामुळे त्यांना त्यांनी लिहिलेला निबंध नंतर आठवण्यासही त्रास झाला. Googleवापरणारा गट: ज्यांनी गुगलवर सर्च करून माहिती मिळवली आणि स्वतःच्या शब्दांत निबंध लिहिला, त्यांच्या मेंदूची सक्रियता चॅटजीपीटी वापरणार्यांपेक्षा जास्त होती. त्यांनी केवळ माहिती घेतली; पण विचार स्वतःचे मांडले, त्यामुळे त्यांची सर्जनशीलता टिकून राहिली.
कोणतीही मदत न घेणारा गट : ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ज्ञानावर निबंध लिहिला, त्यांच्या मेंदूमध्ये सर्वाधिक सक्रियता आणि क्रियाशीलता दिसून आली. त्यांची स्मृती आणि सर्जनशीलता यांचा ताळमेळ उत्कृष्ट होता. त्यांना आपला विषय दीर्घकाळ लक्षात राहिला. संशोधकांच्या मते, जेव्हा आपण ‘एआय’वर पूर्णपणे अवलंबून राहतो, तेव्हा आपला मेंदू माहितीवर प्रक्रिया करणे थांबवतो. यामुळे मानवी मेंदू ‘पॅसिव्ह’ (निष्क्रिय) मोडमध्ये जातो. ‘एआय’ने तयार करून दिलेले काम सोपे वाटत असले, तरी त्यामुळे आपली शिकण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती हळूहळू नष्ट होऊ शकते. थोडक्यात सांगायचे, तर तंत्रज्ञानाची मदत घेणे चांगले आहे. परंतु, त्यासाठी आपल्या नैसर्गिक बुद्धीचा वापर थांबवणे हे भविष्यात मानवाला ‘मूर्ख’ बनवू शकते, असा इशारा या संशोधनातून देण्यात आला आहे.