

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील ‘लाल ग्रह’ म्हणून ओळखल्या जाणार्या मंगळाच्या रंगांमागील वैज्ञानिक कारण आणि त्याचे विविधरंगी स्वरूप आता अधिक स्पष्ट झाले आहे. प्राचीन काळापासून मानवाला आकर्षित करणार्या या ग्रहाबद्दलची नवी माहिती थक्क करणारी आहे. मंगळ खरोखरच लाल आहे का? तिथे अन्य कोणते रंग पाहायला मिळतात, हे यामधून स्पष्ट होते.
प्राचीन संस्कृतींमध्ये मंगळाला त्याच्या लालसर रंगामुळे नेहमीच कुतूहलाने पाहिले गेले आहे. रोमन लोकांनी तर त्याला त्यांच्या युद्धदेवतेचे नाव दिले. कारण, त्याचा रंग त्यांना रक्ताची आठवण करून देत असे. मात्र, विज्ञानाने या लाल रंगामागील खरे कारण स्पष्ट केले आहे. मंगळाच्या पृष्ठभागावरील खडक आणि धूळ यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न ऑक्साईड म्हणजेच लोहाचे ऑक्साईड आहे, ज्यामुळे त्याला हा विशिष्ट लालसर रंग प्राप्त झाला आहे. गंमत म्हणजे, आपल्या रक्ताचा लाल रंगदेखील लोह आणि ऑक्सिजनच्या संयोगामुळेच असतो. त्यामुळे मंगळ आणि रक्ताचा प्राचीन संबंध पूर्णपणे निराधार नव्हता, असे म्हणता येईल.
पृथ्वीवर आढळणारा गंजही याच आयर्न ऑक्साईडचा प्रकार असून, त्याचा रंगही लालसर असतो. मंगळावर पाठवलेल्या विविध यानांनी आणि रोव्हर्सनी घेतलेल्या छायाचित्रांमधून एक वेगळेच सत्य समोर आले आहे. मंगळाचा पृष्ठभाग केवळ लाल रंगाचा नसून, तो अनेक ठिकाणी गंजलेल्या तपकिरी किंवा फिकट तपकिरी रंगाचा दिसतो. 1976 मध्ये मंगळावर उतरलेल्या व्हायकिंग लँडर या पहिल्याच यानाने पाठवलेल्या छायाचित्रात मंगळाची जमीन गंजलेल्या केशरी धुळीने माखलेली दिसत होती. यावरून मंगळाच्या रंगात विविधता असल्याचे स्पष्ट होते.
मंगळाच्या ध्रुवीय प्रदेशात पांढर्या रंगाचे बर्फाचे टोप आढळतात. यात पृथ्वीवरील बर्फाप्रमाणे गोठलेले पाणी तर आहेच; पण त्यावर गोठलेल्या कार्बन डायऑक्साईडचा, म्हणजेच शुष्क बर्फाचा (ड्राय आईस) थरही आहे. सूर्यप्रकाशामुळे हा शुष्क बर्फ वितळतो आणि अंधारात पुन्हा तयार होतो, ज्यामुळे हे बर्फाचे टोप मंगळावरील ऋतूंनुसार लहान-मोठे होतात. विशेष म्हणजे, मंगळ ग्रह केवळ डोळ्यांना दिसणार्या रंगातच प्रकाश उत्सर्जित करत नाही, तर तो अशा काही रंगांमध्येही प्रकाशमान होतो, जे आपण साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. शास्त्रज्ञ यासाठी दुर्बिणींवर लावलेल्या विशेष कॅमेर्यांचा वापर करतात.