

उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा आपण कडक उन्हातून घरात परततो, तेव्हा आपले शरीर प्रचंड गरम झालेले असते आणि घामाने डबडबलेले असते. अशा वेळी अंगाची लाहीलाही कमी व्हावी आणि लगेच आराम मिळावा म्हणून अनेक जण घरी आल्या आल्या थेट बाथरूम गाठतात आणि आंघोळ करतात; पण ही सवय तुमच्या शरीरासाठी खरोखरच फायदेशीर आहे का? तज्ज्ञांच्या मते, कडक उन्हातून आल्या आल्या लगेच आंघोळ करणे आरोग्यासाठी अजिबात सुरक्षित मानले जात नाही. यासाठी योग्य पद्धत अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हालाही उन्हातून आल्यावर लगेच अंघोळ करण्याची सवय असेल, तर आधी शरीराचे तापमान सामान्य होऊ देणे गरजेचे आहे. जाणून घेऊया यासंदर्भातील काही महत्त्वाच्या सावधानता आणि आंघोळ करण्याची योग्य पद्धत...
थर्मल शॉकचा धोका :
जेव्हा तुम्ही कडक उन्हातून घरात येता, तेव्हा तुमच्या शरीराचे अंतर्गत तापमान खूप वाढलेले असते. अशा स्थितीत शरीरावर थेट थंड पाणी घेतल्यास शरीराला अचानक ‘थर्मल शॉक’ (तापमानातील अचानक बदल) बसू शकतो.
होऊ शकतात हे आजार :
या अचानक बसणाऱ्या झटक्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, शरीरात अशक्तपणा जाणवणे किंवा सर्दी-खोकला यांसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरून आल्या आल्या थंड पाण्याने आंघोळ करणे पूर्णपणे टाळावे.
काही वेळ विश्रांती घ्या (१५ ते ३० मिनिटे)
उन्हातून आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य पातळीवर येण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. घरात आल्यावर किमान १५ ते ३० मिनिटे शांत बसा. या काळात तुम्ही पंख्याखाली किंवा आरामखुर्चीवर बसून विश्रांती घेऊ शकता, जेणेकरून शरीर हळूहळू नैसर्गिकरीत्या थंड होईल.
कोमट पाण्याचा वापर करा
विश्रांती घेतल्यानंतर जर तुम्हाला आंघोळ करायचीच असेल, तर अगदी थंड पाण्याऐवजी हलक्या कोमट पाण्याचा वापर करणे कधीही उत्तम ठरते. कोमट पाण्यामुळे शरीराला तापमानाचा अचानक धक्का बसत नाही आणि उन्हामुळे आलेला थकवाही कमी होतो. हा प्रकार शरीराला सुरक्षितपणे फ्रेश (ताजेतवाने) करतो.
आधी घाम पुसून घ्या
उन्हातून आल्यानंतर शरीरावर घाम आणि धूळ जमा होते. अशा वेळी प्रथम ओल्या किंवा सुक्या कपड्याने शरीर पुसून घ्यावे. यामुळे शरीराची उष्णता काही प्रमाणात कमी होते आणि त्यानंतर आंघोळ करणे योग्य ठरते.
पाणी प्यायला विसरू नका
उन्हात राहिल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच ‘डिहायड्रेशन’ होते. अशा वेळी लगेचच पाणी, शहाळ्याचे पाणी किंवा ओआरएस पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीराचे तापमानदेखील नियंत्रित राहते आणि थकवा किंवा अशक्तपणा दूर होतो.