Brain capacity studies | मानवी मेंदूचा आकार घटतोय; पण बुद्धिमत्ता वाढतेय?

संशोधनातून विज्ञानासमोर विरोधाभासी प्रश्न
Brain capacity studies |
Brain capacity studies | मानवी मेंदूचा आकार घटतोय; पण बुद्धिमत्ता वाढतेय?
Published on
Updated on

लंडन : गेल्या काही दशकांपासून वैज्ञानिकांच्या एका गटाने असा दावा केला आहे की, आदिमानवाच्या तुलनेत आधुनिक मानवाचा मेंदू आकाराने लहान होत चालला आहे. विशेष म्हणजे, मेंदूचा आकार कमी होत असूनही मानवाचा आयक्यू (बुद्ध्यांक) मात्र वाढत असल्याचे दिसून आले आहे. या विचित्र विरोधाभासाने विज्ञानासमोर नवे प्रश्न उभे केले आहेत.

मेंदू खरंच आकाराने लहान झाला आहे का?

डार्टमाउथ कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ जेरेमी डिसिल्वा आणि त्यांच्या टीमने 5,000 हून अधिक कपाळांच्या हाडांचा (कवठी) अभ्यास केला. त्यांच्या मते, गेल्या 11,700 वर्षांत (होलोसीन युग) मानवी मेंदूच्या आकारमानात सुमारे 10 टक्क्यांनी (सुमारे 150 मिली) घट झाली आहे. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ मासेज हेनेबर्ग यांनीही याला दुजोरा दिला असून, ही घट जगभरातील विविध मानवी लोकसंख्येमध्ये दिसून आल्याचे सांगितले आहे. मात्र, सर्वच शास्त्रज्ञ या मताशी सहमत नाहीत. युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडाचे ब्रायन विल्मोर यांच्या मते, आधुनिक मानवाचा आकार निश्चित झाल्यापासून मेंदूत कोणतेही लक्षणीय बदल झालेले नाहीत.

मेंदू आकाराने लहान होण्याची प्रमुख कारणे

शास्त्रज्ञांनी मेंदू आकाराने लहान होण्यामागे तीन महत्त्वाची कारणे सांगितली आहेत :

शेती आणि बदललेली जीवनशैली : सुमारे 10,000 वर्षांपूर्वी मानवाने शेती करण्यास सुरुवात केली. शिकार करण्यासाठी लागणारी प्रचंड शारीरिक ताकद आणि मोठ्या शरीराची गरज कमी झाली. जसे मानवाचे शरीर लहान झाले, तसेच मेंदूचा आकारही नैसर्गिक निवडीनुसार (नॅचरल सिलेक्शन) कमी झाला.

सामूहिक बुद्धिमत्ता (कलेक्टीव्ह इंटिजिनेन्स) : मुंग्या किंवा मधमाश्यांप्रमाणे मानव आता समाजात राहतो. पूर्वी एका व्यक्तीला जगण्यासाठी सर्वच गोष्टींची माहिती असावी लागायची. आता आपण विशिष्ट कामात तज्ज्ञ झालो आहोत (उदा. कोणी मेकॅनिक आहे तर कोणी डॉक्टर). यामुळे व्यक्तीच्या मेंदूवरील कामाचा ताण कमी झाला असून आपण सांस्कृतिक आणि तांत्रिक नेटवर्कवर अधिक अवलंबून आहोत.

ऊर्जेची बचत : मेंदू हा शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा (सुमारे 20%) वापरणारा अवयव आहे. मेंदूचा आकार थोडा कमी झाल्यामुळे अन्नाची गरज कमी लागते, जे दुष्काळ किंवा अन्न टंचाईच्या काळात जगण्यासाठी फायदेशीर ठरते.

आकार लहान म्हणजे बुद्धी कमी का?

तज्ज्ञांच्या मते, मेंदूचा आकार आणि बुद्धिमत्ता यांचा थेट संबंध नसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन. त्यांचा मेंदू आकाराने लहान होता; परंतु त्यांच्या मेंदूतील विशेष वळ्यांमुळे (फ्लोडिंग पॅटर्न्स) ते अलौकिक प्रतिभेचे धनी ठरले. मानवाने स्वतःची वैयक्तिक क्षमता कमी करून सामूहिक बुद्धिमत्तेचा मार्ग स्वीकारला आहे. आपण आता केवळ स्वतःच्या मेंदूवर अवलंबून नसून आपल्या संस्कृती आणि तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. त्यामुळे मेंदू लहान होत असला तरी, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अधिक स्मार्ट होत आहोत, असे निरीक्षण शास्त्रज्ञ नोंदविताना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news