Homo Habilis | ’होमो हॅबिलिस’ हा खरोखर मानवी वंश आहे का?

नव्या सांगाड्याच्या शोधामुळे निर्माण झाले प्रश्नचिन्ह
Homo Habilis |
Homo Habilis | ’होमो हॅबिलिस’ हा खरोखर मानवी वंश आहे का?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : वानरापासून मानवापर्यंतच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील पहिला महत्त्वाचा भाग ‘होमो हॅबिलिस’चा येतो. हाताचा कुशलपणे वापर करू शकणार्‍या सुरुवातीच्या मानवी प्रजातीचा हा टप्पा आहे. त्यानंतर ‘होमो इरेक्टस्’ म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून चालणार्‍या व पुढे अतिशय बुद्धिमान अशा ‘होमो सेपियन्स’चा टप्पा येतो. ‘होमो सेपियन्स’लाच आधुनिक मानवाचा पूर्वज मानले जाते. गेल्या 60 वर्षांपासून मानवी वंशातील सर्वात जुनी आणि रहस्यमय प्रजाती मानल्या जाणार्‍या ‘होमो हॅबिलिस’बाबत आता वैज्ञानिकांमध्ये मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. नुकत्याच सापडलेल्या एका नवीन सांगाड्यामुळे, हा जीव खरोखर ‘मानव’ (Homo genus) म्हणवण्यास पात्र आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

1964 मध्ये ‘होमो हॅबिलिस’चा समावेश आपल्या पूर्वजांच्या यादीत करण्यात आला होता. हा जीव साधारणत: 24 लाख ते 16.5 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. आतापर्यंत या प्रजातीचे केवळ तीन अपूर्ण सांगाडे उपलब्ध होते. मात्र, जानेवारी महिन्यात संशोधकांनी चौथ्या आणि अधिक पूर्ण असलेल्या एका सांगाड्याचे वर्णन केले आहे. या सांगाड्याची शरीररचना मानवापेक्षा अत्यंत वेगळी असल्याचे दिसून आले आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे पॅलेओअँर्थोपोलॉजिस्ट बर्नार्ड वूड यांनी सांगितले की, ‘जसे नवीन जीवाश्म सापडत गेले, तसतशी आपण ‘होमो’ (मानव) या व्याख्येची व्याप्ती वाढवत गेलो. मात्र, कदाचित यावेळी आपण ही व्याख्या गरजेपेक्षा जास्त ताणली आहे.’ आपल्याला माहीत आहे की, आधुनिक मानव (होमो सेपियन्स) हे ‘होमो’ या वंशातील आहेत, तर चिम्पांझी नाहीत.

साधारणत: 50 लाख वर्षांपूर्वी मानवी वंश चिम्पांझींच्या वंशापासून वेगळा झाला. मात्र, नेमका ‘मानवी’ वंश केव्हा सुरू झाला, याबाबत वाद आहे. सुरुवातीला ‘ल्युसी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ऑस्ट्रॅलोपिथेकस अ‍ॅफरेन्सिस’ (Australopithecus afarensis) या प्रजातीला अनेक संशोधक मानव मानत नाहीत; कारण त्यांचे हात माकडांसारखे लांब आणि मेंदूचा आकार लहान होता. 1960 च्या दशकात टान्झानियामध्ये 17.5 लाख वर्षे जुना ‘होमो हॅबिलिस’चा सांगाडा सापडला होता. त्याच्या मेंदूचा आकार मानवाच्या तुलनेत 45 टक्के होता, जो आधीच्या प्रजातींच्या (35 टक्के) तुलनेत मोठा होता. याच कारणामुळे त्यांना ‘होमो हॅबिलिस’ (कौशल्य असलेला मानव) असे नाव देण्यात आले आणि मानवी वंशात स्थान मिळाले. परंतु, नवीन सांगाड्याच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, त्यांची शरीररचना मानवापेक्षा वन्यप्राण्यांशी अधिक मिळतीजुळती असावी. जर ‘होमो हॅबिलिस’ला मानवी वंशातून बाहेर काढले, तर मानवी इतिहासाची पुस्तके पुन्हा लिहावी लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news