

वॉशिंग्टन : एलियन (परग्रहवासी) खरोखरच अस्तित्वात आहेत का, यावर जगात अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे. मात्र, आता एका आघाडीच्या अनुवंशशास्त्रज्ञाने केलेला दावा ऐकून संपूर्ण जग थक्क झाले आहे. डॉ. मॅक्स रेम्पेल या शास्त्रज्ञाच्या मते, एलियन्सचा शोध घेण्यासाठी आपल्याला ताऱ्यांकडे पाहण्याची गरज नाही, कारण त्यांचे पुरावे आधीच मानवी डीएनएमध्ये दडलेले असू शकतात. मानवी जीन्समध्ये एलियन डीएनएचा पद्धतशीरपणे समावेश करण्यात आला आहे, या सिद्धांतावर ते सध्या काम करत आहेत.
११ कुटुंबांमध्ये आढळले धक्कादायक पुरावे :
सॅन डिएगो येथील ‘डीएनए रेझोनन्स रिसर्च फाऊंडेशन'शी जोडलेल्या डॉ. रेम्पेल यांनी '२३ ॲंडमी'च्या डेटाचे विश्लेषण केले होते. या तपासणीत त्यांना जगभरातील अशी ११ कुटुंबे आढळली, ज्यांच्या शरीरात डीएनएचे असे मोठे तुकडे आहेत, त्यांचा पृथ्वीवरील कोणत्याही मानवाशी किंवा प्राण्याशी संबंध जोडता येत नाही. हे जेनेटिक तुकडे पूर्णपणे अनैसर्गिक वाटतात आणि ते बाहेरून शरीरात टोचल्यासारखे दिसतात. ज्या लोकांमध्ये हे बदल आढळले त्यांचा जन्म १९९० पूर्वीचा आहे, त्यामुळे मानवी ‘जीन-एडिटिंग’ तंत्रज्ञानाचा यात वापर झालेला नाही, कारण हे तंत्रज्ञान २०१३ मध्ये अस्तित्वात आले. डॉ. रेम्पेल यांच्या मते, ‘आपण सर्वजण प्राचीन एलियनचे संकरित (हायब्रिडस) वंशज आहोत.’
सीआयए ठेवत आहे गुप्त पाळत?
या संशोधनासोबतच एका मोठ्या कॉन्स्पिरसी थेअरीने (सत्य लपवल्याचा संशय) लोकांचे लक्ष वेधले आहे. अमेरिकेच्या लष्कराचे माजी गुप्तहेर लिली बुकानन यांनी दावा केला आहे की, अमेरिकेची गुप्तहेर संघटना 'सीआयए' सामान्य लोकांच्या व्यावसायिक डीएनए डेटाबेसवर गुप्तपणे पाळत ठेवत आहे. एलियन्सच्या वंशातील लोक शोधण्यासाठी सीआयए या डेटाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तथापि, डीएनए कंपन्यांनी हे आरोप फेटाळले असून कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणालाही डेटा दिला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पुढील संशोधनाची तयारी
डॉ. रेम्पेल आता 'स्टारसीड जेनेटिक्स' नावाचा एक नवा प्रकल्प सुरू करत आहेत, ज्यामध्ये एलियन्सनी अपहरण केल्याचा दावा करणाऱ्या ५० कुटुंबांच्या डीएनएची सखोल चाचणी केली जाईल. मुख्य प्रवाहातील इतर शास्त्रज्ञांनी रेम्पेल यांच्या दाव्यांवर शंका उपस्थित केली असली, तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी क्रोमोसोममध्ये एलियन डीएनएचा स्पष्ट पुरावा मिळाल्यास, परग्रहवासीयांचे अस्तित्व जगासमोर सिद्ध होईल, असा विश्वास रेम्पेल यांनी व्यक्त केला आहे.