Vegan Diet | व्हेगन डाएट खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Vegan Diet |
Vegan Diet | व्हेगन डाएट खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तम आरोग्याचा विषय निघताच सर्वात आधी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. आपण ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेक संशोधनांमध्ये ‘प्लांट बेस्ड डाएट’ म्हणजेच वनस्पतींपासून मिळणारे अन्न आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. यामुळेच आज जगभरात ‘व्हेगन डाएट’कडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. व्हेगन डाएटमध्ये केवळ मांस-मासे वर्ज्य नसतात, तर दूध, दही, पनीर, लोणी, अंडी आणि प्राण्यांपासून मिळणारे इतर सर्व अन्नपदार्थही पूर्णपणे वर्ज्य केले जातात. म्हणजेच, हा आहार पूर्णपणे वनस्पतींपासून मिळणाऱ्या घटकांवर आधारित असतो. हा आहार कितपत लाभदायक आहे आणि त्यावरच विसंबून राहण्याचे कोणते धोके आहेत, यावर आता एका नव्या अहवालाने प्रकाश टाकला आहे.

व्हेगन डाएट म्हणजे फक्त फळे आणि सॅलड खाणे नव्हे! यामध्ये कार्बोहायड्रेटस्‌साठी अखंड धान्य, प्रथिनांसाठी डाळी, बीन्स, सोया आणि निरोगी चरबीसाठी सुका मेवा व बियांचा समावेश केला जाऊ शकतो. वैद्यकीय अहवालानुसार, व्हेगन डाएटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. फळे, भाज्या, धान्य आणि डाळींमुळे शरीराला भरपूर फायबर आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. अनेक अभ्यासांमध्ये व्हेगन डाएटमुळे वजन, बॉडी मास इंडेक्स आणि मेटाबॉलिझमशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांनी सलग १२ आठवडे व्हेगन डाएट पाळल्यास त्यांच्या शरीराचे वजन, बीएमआय, HbA1c (रकक्तातील शर्करा) आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीत मोठी घट नोंदवली गेली आहे; पण प्रश्न असा पडतो की, व्हेगन डाएट खरोखरच प्रत्येकासाठी आरोग्यदायी असते का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ व्हेगन डाएट पाळणाऱ्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची गंभीर कमतरता निर्माण होण्याचा धोका असतो.

व्हिटॅमिन बी१२ चे मुख्य स्त्रोत हे प्राण्यांपासून मिळणारे पदार्थच असतात. शरीरात लाल रक्तपेशी (RBCs) तयार करण्यासाठी, मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि डीएनएच्या निर्मितीसाठी हे व्हिटॅमिन अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर हे व्हिटॅमिन स्वतः तयार करत नाही. प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे २.४ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी१२ ची गरज असते, जी अन्न किंवा सप्लिमेंटस्‌द्वारे पूर्ण करावी लागते. व्हिटॅमिन बी१२ व्यतिरिक्त, दीर्घकाळ व्हेगन डाएट घेणाऱ्यांमध्ये लोह, कॅल्शियम, आयोडीन, व्हिटॅमिन डी आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांची कमतरता भासण्याचा धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, संतुलित पद्धतीने स्वीकारलेले व्हेगन डाएट शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. परंतु, जर तुम्ही व्हेगन डाएट सुरू करण्याचा विचार करत असाल, तर शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांची (विशेषतः बी१२) कमतरता भासणार नाही याकडे लक्ष ठेवणे आणि डॉक्टरांच्या किंवा न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याने सप्लिमेंटस्‌ घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news