
वॉशिंग्टन : हिंदी महासागराच्या तळाशी, सुमारे 2,780 मीटर (1.7 मैल) खोल समुद्रात एक अद्भुत जीव राहतो...‘स्केली-फूट स्नेल’ किंवा ‘व्हॉल्कॅनो स्नेल’. या गॅस्ट्रोपॉड प्रकारातील शंखाच्या गोगलगायीला इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा वेगळे बनवते ते म्हणजे त्याचे लोखंडाच्या मजबूत कवचाचे संरक्षण. या गोगलगायीच्या पायाला शेकडो लहान, एकमेकांवर चढलेले लोहयुक्त खवले झाकून टाकतात. हे खवले ते समुद्रतळाच्या हायड्रोथर्मल व्हेंटस् व ब्लॅक स्मोकर चिमन्यांमधून बाहेर पडणार्या गरम द्रवांमधून शोषलेले खनिज वापरून तयार करतात, जिथे पाण्याचे तापमान तब्बल 400 अंश सेल्सिअसपर्यंत असते. या खवल्यांमध्ये गंधक आणि लोखंड यांचे संयोग होऊन आयर्न सल्फाइड नॅनोपार्टिकल्स तयार होतात.
या गोगलगायीच्या कवचावरही एक आयर्न सल्फाइडचा थर असतो, जो त्याच्या संरचनेला अधिक मजबूत बनवतो. त्यामुळे स्केली-फूट स्नेल हा असा एकमेव ज्ञात बहुकोशीय प्राणी आहे, जो आपल्या सांगाड्याला लोखंडाने बळकटी देतो. 2015 मध्ये वेल्सच्या राष्ट्रीय संग्रहालयाने जेव्हा काही नमुने मिळवले, तेव्हा त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की प्रिझर्वेटिव्हमध्ये पाणी वापरू नका, कारण या गोगलगायीला गंज लागू शकतो! इतक्या कडक कवचाखाली, या गोगलगायीचे हृदयही तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. शरीराच्या एकूण आकाराच्या 4 टक्के इतके मोठे हृदय असणारे हे प्राणीजगतातील सर्वात मोठे हृदय आहे (प्रमाणानुसार).
कमी ऑक्सिजन असलेल्या खोल पाण्यात हे हृदय फक्त गोगलगायीलाच नव्हे, तर तिच्या शरीरात राहणार्या सांद्र जिवाणूंना देखील ऑक्सिजन पुरवते. हे जीवाणू गोगलगायीच्या अन्ननलिकेतील ग्रंथीत राहतात आणि त्यासाठी अन्न तयार करतात म्हणजेच, त्याचं एक अंतर्गत अन्ननिर्माण केंद्रच! या गोगलगायीच्या कवचाची लांबी सरासरी 5 सें.मी. (2 इंच) इतकी असते आणि याला ‘सी पँगोलिन’ असेही म्हटले जाते, कारण त्याचा संरक्षक कवच पँगोलिन या भू-प्राण्याशी साधर्म्य साधतो. या गोगलगायींमध्ये नर व मादी असे दोन्ही लैंगिक अवयव असतात. ते फक्त मॉरिशस बेटाच्या पूर्वेला असलेल्या तीन हायड्रोथर्मल व्हेंट फील्डस्मध्ये आढळतात.
जरी यांचा संभाव्य अधिवास सुमारे 0.3 चौरस किलोमीटर (0.1 चौ. मैल) असला, तरी प्रत्यक्षात केवळ 0.02 चौ. कि.मी. (0.008 चौ. मैल) क्षेत्रातच ते सापडतात. मानवाच्या खोल समुद्रातील खाणकामामुळे या प्राण्यांच्या अस्तित्वाला मोठे संकट निर्माण झाले आहे. 2019 मध्ये IUCN ( International Union for Conservation of Nature) ने या प्रजातीला आपल्या रेड लिस्टमध्ये ‘अतिविलुप्तप्राय‘ (Endangered) म्हणून वर्गीकृत केले. हा असा पहिला प्राणी ठरला, ज्याला खोल समुद्रातील खाण कामामुळे थेट अशा संकटाचा सामना करावा लागला.