

लंडन : उत्तर इंग्लंडमधील यॉर्कशायर भागात लोहयुगातील दोन प्रचंड मोठे साठे सापडले असून, यामध्ये जळालेली धातूची शस्त्रे, भांडी आणि रथांच्या अवशेषांचा समावेश आहे. हा खजिना एखाद्या बलाढ्य राणीच्या किंवा राजघराण्यातील व्यक्तीच्या शाही अंत्यसंस्काराचा भाग असावा, असा खळबळजनक दावा पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केला आहे.
2021 मध्ये मेलसनबी गावाजवळ एका ‘मेटल डिटेक्टरिस्ट’ला हे साठे सापडले होते. त्यानंतर झालेल्या उत्खननात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 950 पेक्षा जास्त वस्तू आढळून आल्या. यात लाकडी चाकांच्या लोखंडी पट्ट्या (टायर्स), एक मोठा कढईसारखा टोप, मद्य मिश्रित करण्यासाठी वापरले जाणारे नक्षीदार भांडे आणि औपचारिक कामांसाठी वापरली जाणारी भाल्याची टोके यांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या लोहयुगातील सर्वात मोठ्या साठ्यांपैकी हा एक आहे.
‘अँटिक्विटी’ जर्नलमध्ये 17 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या वस्तू मुद्दाम जाळून आणि तोडून जमिनीत गाडल्या गेल्या होत्या. ड्युरम युनिव्हर्सिटीचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ टॉम मूर यांनी सांगितले की, ‘येथे कोणत्याही मृतदेहाचे अवशेष सापडलेले नाहीत, त्यामुळे हे थेट दफनस्थान नाही. परंतु, त्या काळातील प्रथांनुसार महत्त्वाच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी अशा मौल्यवान वस्तूंचे दहन करून त्या गाडल्या जात असत.’ हे अवशेष ‘ब्रिगाँटेस’ या लोहयुगातील एका शक्तिशाली ब्रिटिश टोळीशी संबंधित असल्याचे मानले जाते. हा खजिना स्टॅनविक या शाही ठिकाणापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर सापडला आहे. स्टॅनविक हे त्याकाळी एका तटबंदीने वेढलेले गाव होते, ज्याला रोमन लोक ‘ओपिडम’ म्हणत असत.