

तेहरान : इराणच्या होर्मुझ बेटाच्या किनार्यांनी पुन्हा एकदा एका अलौकिक बदलाने जगाला आश्चर्यचकित केलं आहे. मुसळधार पावसानंतर, बेटाचे किनारे आणि किनारी पाण्याचा रंग रक्ताप्रमाणे लाल झाला आहे. याचे व्हिडीओ समोर आले असून, सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निसर्गाचा हा गूढ देखावा पाहिल्यानंतर हे द़ृश्य पृथ्वी नव्हे तर एखाद्या परग्रहावरील असावं असं वाटत आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पर्शियन आखातात असलेले हे छोटे बेट त्याच्या नाट्यमय भूद़ृश्य आणि बहुरंगी भूगर्भ रचनेसाठी आधीच प्रसिद्ध आहे. पण, जेव्हा पावसाचे पाणी होर्मुझच्या लोह-समृद्ध टेकड्या आणि मातीतून वाहते, तेव्हा त्याचे परिणाम मंत्रमुग्ध करणारे असतात. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ही घटना बेटाच्या खडकांमध्ये असलेल्या आयर्न ऑक्साईड, विशेषतः हेमाटाईटच्या उच्च सांद्रतेमुळे घडते. पाऊस ही खनिजे विरघळवून वाहून नेत असताना, हे वाहते पाणी वाळू आणि उथळ समुद्राच्या पाण्याला रंगाची छटा देतात.
हेमॅटाईट, जे आयर्न ऑक्साईडचे (FeO) नैसर्गिकरीत्या आढळणारे खनिज रूप आहे, तेच मंगळ ग्रहावर दिसणार्या लाल रंगांसाठीदेखील जबाबदार आहे आणि यामुळेच होर्मुझला कधीकधी ‘पर्शियन आखाताचे इंद्रधनुष्य बेट’ असे म्हटले जाते. जेव्हा ओलाव्याच्या संपर्कात येतात, तेव्हा हेमॅटाईट-समृद्ध मातीचे अधिक वेगाने ऑक्सिडीकरण होते, ज्यामुळे तिचा रंग अधिक गडद होतो. पावसाळ्यादरम्यान आणि त्यानंतर, हे सूक्ष्म खनिज कण धूप आणि पृष्ठभागावरील प्रवाहाद्वारे किनार्यापर्यंत वाहून आणले जातात, ज्यामुळे किनार्याला एका विशाल लाल रंगाचं रूप येतं. स्थानिक रहिवासी आणि पर्यटक या नैसर्गिक चमत्काराचे वारंवार फोटो, व्हिडीओ काढत असतात.