

कॅनबेरा : संशोधकांनी पृथ्वीच्या पोटातील एक असे रहस्य शोधले आहे ज्यामुळे आतापर्यंतच्या सर्व धारणा बदलू शकतात. नव्या संशोधनात असे दिसून आले की पृथ्वीच्या आंतरीक कोअरच्या आतही एक किंवा त्यापेक्षा अधिक कोअर अस्तित्वात आहेत. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे भूभौतिक शास्त्रज्ञ जोआन स्टीफन्सन आणि त्यांच्या सहकार्यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांना आढळले की आंतरीक कोअरमध्ये दोन वेगवेगळे स्तर असू शकतात.
स्टीफन्सन यांनी 2021 मधील एका संशोधनावेळी सांगितले होते की पारंपरीकरितीने आपल्याला शिकवण्यात आले आहे की पृथ्वीचे मुख्य चार स्तर आहेत. त्यामध्ये क्रस्ट, मेंटल, बाह्य कोअर आणि आंतरीक कोअर यांचा समावेश होतो. पृथ्वीच्या बाह्य आवरणाच्या म्हणजेच क्रस्टच्या खाली काय आहे याचे ज्ञान मुख्यत्वे ज्वालामुखी व भूकंप लहरींमुळे होत असते. पृथ्वीचा आंतरीक कोअर त्याच्या एकूण आयतनच्या केवळ एक टक्का आहे. त्याचे तापमान 5 हजार अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक असते. आता नव्या संशोधनात दिसले की आंतरीक कोअरमध्ये दोन वेगवेगळे स्तर असू शकतात. ते म्हणाले, हे संशोधन रोमांचकारी आहे. आपल्याला शाळेची पाठ्यपुस्तके पुन्हा नव्याने लिहावी लागतील! संशोधनावेळी टीमने अॅल्गोरिदमचा वापर करून आंतरीक कोअरच्या हजार मॉडेल्सचा मिलाफ अनेक दशकांपासून पाहिलेल्या आकडेवारीत केला. या आकड्यांमध्ये भूगंपीय लहरींच्या पृथ्वीच्या पोटातील प्रवासाच्या वेळेची माहिती होती. आंतरराष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही आकडेवारी गोळा केली होती. स्टीफन्सन यांनी सांगितले की आम्हाला असे पुरावे मिळाले आहेत, जे लोहाच्या संरचनेतील बदलाचे संकेत देतात. पृथ्वीच्या इतिहासातील कदाचित दोन वेगवेगळ्या शीतलन घटनांना ते सुचवतात.