

नवी दिल्ली : भारतात इन्स्टाग्राम रील्स हे आता सर्वात लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म बनले आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, रील्सने व्हॉटस्अॅप, यूट्यूब आणि टीव्हीसारख्या पारंपरिक माध्यमांना मागे टाकले आहे, असा दावा मेटाने केला आहे. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम रील्सला भारतात पाच वर्षे पूर्ण करत असताना हे यश मिळाले आहे.
मेटाने ‘आयपीएसओएस’ या संस्थेमार्फत 33 शहरांमधील 3,500 पेक्षा जास्त लोकांवर सर्वेक्षण केले. यातून असे समोर आले की, शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ (लघू व्हिडीओ) हा भारतातील सर्वात जास्त पाहिला जाणारा कंटेंट बनला आहे. जवळपास 97 टक्के लोक दररोज शॉर्ट व्हिडीओ पाहतात, आणि यापैकी 92 टक्के लोक रील्सला त्यांची पहिली पसंती दिली आहे. हे सर्वेक्षण असेही दर्शवते की, ‘जनरेशन झेड’ (जीइएन झेड) आणि शहरी उच्च उत्पन्न गटांमध्ये रील्स सर्वात लोकप्रिय आहे. ब्रँडस्ना ओळख निर्माण करण्यासाठी आणि क्रिएटर्सना जोडणी साधण्यासाठी रील्स सर्वोत्तम ठरले आहे, असा दावाही मेटाने केला आहे.
मेटाने दिलेल्या माहितीनुसार 80 टक्के भारतीय लोक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन ब्रँडस्चा शोध घेतात. भारतात रील्स आता सांस्कृतिक संवादाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. प्लॅटफॉर्मवर फॅशन आणि ट्रेंडशी संबंधित कंटेंट 40 टक्के जास्त पाहिला जातो, सौंदर्य आणि मेकअप व्हिडीओ 20 टक्के जास्त, तर संगीत आणि चित्रपटांशी संबंधित कंटेंट 16 टक्के जास्त पाहिला जातो.
मेटाने क्रिएटर्स आणि मार्केटर्सना ‘सोशल-फर्स्ट क्रिएटिव्ह’ वर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. याचा अर्थ, केवळ रील्ससाठी खास बनवलेला कंटेंट तयार करावा. याव्यतिरिक्त, ब्रँडस्साठी क्रिएटर्ससोबत काम करणे आणि सांस्कृतिकद़ृष्ट्या संबंधित आणि अस्सल कंटेंट सादर करणे फायदेशीर ठरू शकते, असेही त्यांनी सुचवले आहे.