

मुंबई : उद्योगपती योहान पूनावाला यांच्याकडे तब्बल 22 रोल्स-रॉईस कारचा संग्रह असून, तो भारतातील कोणत्याही एका व्यक्तीकडे असलेल्या रोल्स-रॉईसचा सर्वात मोठा संग्रह आहे. पूनावाला यांचा कार संग्रह केवळ रोल्स-रॉईसपुरता मर्यादित नसून, त्यात लॅम्बोर्गिनी, फेरारी आणि बेंटलेसारख्या महागड्या आणि दुर्मीळ गाड्यांचाही समावेश आहे.
योहान पूनावाला यांच्याकडील ‘1949 रोल्स-रॉईस सिल्व्हर राईथ’ ही विंटेज कार विशेष प्रसिद्ध आहे. या कारने युकेमधील सॅलोन प्राइव्ह 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘ड्यूक ऑफ मार्लबोरो’ पुरस्कार जिंकला आहे. या कारमध्ये विशेष पोर्तुगीज लाकडी फोल्डिंग टेबल आणि चांदीच्या वस्तूंसारख्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. त्यांच्या संग्रहात नुकतीच भर पडलेली ‘रोल्स-रॉईस फँटम VIII ईडब्ल्यूबी’ ही कार 22 वी रोल्स-रॉईस आहे.
या कारमध्ये 6.75 लिटर V12 पेट्रोल इंजिन आहे आणि तिची किंमत सुमारे 22 कोटी रुपये आहे. यात खास ‘प्रायव्हसी सूट’ फीचर आहे, जे आता रोल्स-रॉईसने देणे बंद केले आहे. ‘1962 रोल्स-रॉईस फँटम V’ ही सात-प्रवाशांची लिमोझीन असून, ती जेम्स यंगने तयार केली होती. ही कार 1962 च्या जिनिव्हा शोमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. ‘1927 रोल्स-रॉईस 20 एचपी टूरर’ ही विंटेज कार कधीकाळी गुजरातमधील ‘सचिन’ नावाच्या संस्थानातील नवाबाची होती.
योहान पूनावाला यांना 2023 मध्ये ‘द क्लासिक कार ट्रस्ट’ने युरोपमधील ‘जगातील टॉप 100 क्लासिक कार संग्राहकांपैकी’ एक म्हणून स्थान दिले. त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट आणि इतर सोशल मीडियावर त्यांच्या कार कलेक्शनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो उपलब्ध आहेत. त्यांनी आपल्या दुर्मीळ आणि ऐतिहासिक गाड्यांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत, ज्यामुळे त्यांचे नाव जागतिक स्तरावर ‘क्लासिक कार अॅम्बॅसडर’ म्हणून ओळखले जाते.