Indonesia Ganesha Idol | इंडोनेशियात सिंथेटिक रॅटनपासून बनवली सर्वात उंच गणेशमूर्ती

गिनिज बुकमध्ये झाली नोंद
Indonesia Ganesha Idol |
Indonesia Ganesha Idol | इंडोनेशियात सिंथेटिक रॅटनपासून बनवली सर्वात उंच गणेशमूर्ती
Published on: 
Updated on: 

जकार्ता : एका गणेशमूर्तीची थेट ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे, पण ही गणेशमूर्ती महाराष्ट्र किंवा भारतातील नसून ती चक्क इंडोनेशियामधील आहे. तेथील सुंदर बेट असलेल्या बालीमध्ये गणपतीची ही विशाल मूर्ती तयार करण्यात आली आहे. ५० फुटांपेक्षा जास्त उंच असणाऱ्या या मूर्तीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे ही मूर्ती दगड, माती, लोखंड किंवा सिमेंटचा वापर करून नाही तर सिंथेटिक रॅटनच्या सहाय्याने करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची १५.३१५ मीटर म्हणजे जवळपास ५० फूट २ इंच आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉडर्स्‌ने ही जगातील सर्वात मोठी ‘आधार असणारी सिंथेटिक रॅटन मूर्ती’ असल्याचे म्हटले आहे. ही मूर्ती बालीमधील कंपनी ‘अलास हारुम बाली’ बनवली आहे.

ही भव्य मूर्ती इंडोनेशियातील बाली प्रांतातील गियान्यार येथे उभारण्यात आली आहे. हिंदू धर्मात गणेशाला बुद्धिमत्ता, यश, सौभाग्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. भारतातील इंडोनेशिया दूतावासानेही फेसबुकवर या मूर्तीचे फोटो आणि माहिती शेअर केली असून, बालीमध्ये तिचे अनावरण करण्यात आल्याचे सांगितले आहे. इंडोनेशियातील ‘गिनिज वर्ल्ड रेकॉडर्स्‌’नेही या कामगिरीची पुष्टी केली आहे. मात्र, हा जगातील सर्वात उंच गणेशमूर्तीचा विक्रम नाही; तर हा ‘सिंथेटिक रॅटन’ (कृत्रिम वेत) पासून बनवलेल्या आणि आधार (सपोर्ट) असलेल्या सर्वात उंच मूर्तीचा विक्रम आहे.

इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे आणि तिथे इस्लाम हा प्रमुख धर्म आहे. असे असूनही, या देशाची संस्कृती आणि इतिहास हिंदू व बौद्ध परंपरांनी खोलवर प्रभावित आहे. विशेषतः, इंडोनेशियातील ‘बाली’ प्रांत आपल्या हिंदू संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे मोठ्या संख्येने लोक हिंदू धर्माचे पालन करतात आणि हिंदू प्रथा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा व संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. बालीमध्ये अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत. त्यापैकी ‘पुरा बेसाकिह’ हे मुख्य मंदिर मानले जाते, तर समुद्राच्या काठी वसलेले ‘तानाह लोट’ मंदिरही अत्यंत प्रसिद्ध आहे. बालीच्या संस्कृतीत रामायण आणि महाभारतातील कथांना विशेष स्थान आहे. पारंपरिक नृत्य आणि नाटकांच्या माध्यमातून ही महाकाव्ये जिवंत केली जातात. ‘केचक’ हे बालीचे एक प्रसिद्ध पारंपरिक नृत्य असून, त्यात रामायणातील विविध प्रसंग, जसे की सीतेचे अपहरण आणि रावणाविरुद्धचे युद्ध दर्शवले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.