

चेन्नई : आपल्या देशात अनेक सुंदर महाल पाहायला मिळतात. त्यामध्ये बडोद्याचा लक्ष्मीविलास पॅलेस, म्हैसूरचा राजवाडा किंवा ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेससारख्या अनेक महालांचा समावेश होतो. राजस्थानात तर एकापेक्षा एक सुंदर राजवाडे आहेत; मात्र दक्षिण भारतात एक असा पॅलेस आहे, जो आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे लक्षवेधक ठरतो. हा देशातील सर्वात मोठा लाकडी महाल आहे. तिथे पाऊल ठेवताच आपल्याला आपण ४०० वर्षे मागे गेल्याचे वाटते. हा आहे प्रसिध्द पद्मनाभपूरम पॅलेस. हा महाल त्याच्या गुप्त भूमिगत भूयारे, शतकाहून जुने पेंटिंग्स आणि लाकडाच्या उत्कृष्ट कोरीव कामासाठी ओळखला जातो.
हे साम्राज्य १६०१ चे आहे, जे 'वेनाड साम्राज्य' म्हणून ओळखले जाते. सन १७५० पर्यंत महाराजा मार्तंड वर्मा यांनी त्यांचे राज्य भगवान पद्मनाभ यांना समर्पित केले आणि या राजधानीचे नाव बदलून 'पद्मनाभपूरम' असे करण्यात आले होते. ज्याचा अर्थ “भगवान पद्मनाभ” यांचे निवासस्थान होय. तेथील या सुंदर लाकडी महालाची फरशीची जमीन आजही काचेसारखी चमकते आणि सर्वांनाच हे मोठे रहस्य वाटते. असे म्हटले जाते कारागीरांनी ही फरशी तयार करण्यासाठी कोळसा, चुना, जळालेल्या नारळाचे करवंट्या आणि झुडुपांच्या रसांचा वापर केला होता. परंतु, या बनवण्याची पद्धत नेमकी काय होती, याचे कोणतेही लिखित रेकॉर्ड उपलब्ध नाही. 'राजमातेचा महाल' हा महालाचा सर्वात जुना भाग आहे. येथे एक पारंपरिक अंगण आहे.
ज्याच्या चारी बाजूला लाकडाचे सुंदर कोरीव काम केलेले आहे. येथे एक गुप्त भूमिगत भूयार आहे, ज्याचा वापर राजा-महाराजांना अडचणीच्या काळात गुपचूपपणे सुरक्षित निसटण्यासाठी करण्यात यायचा. राजाची एक बैठकीची खोली होती, तिला अशाप्रकारे डिझाईन केले होते की, बाहेर कितीही उष्णता असली, तर ही खोली नेहमीच नैसर्गिकरीत्या थंड राहायची. तिच्या लाकडी झरोक्या तीव्र उन्हाला रोखायच्या, मात्र थंड हवेला आत येऊ द्यायच्या. येथील विशाल डायनिंग हॉल त्रावणकोरच्या राजांचे मोठे हृदय आणि त्यांच्या श्रीमंतीची कहाणी सांगतात. जुन्या काळात जेव्हा कोणताही मोठा शाही उत्सव असायचा, तेव्हा येथे एकाच वेळी हजारो पाहुण्यांना मेजवानी दिली जायची.