

नवी दिल्ली : भारत केवळ स्वदेशी इंजिनच नाही, तर स्वदेशी लढाऊ विमानही बनवत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिलीपबाबू विजयकुमार यांनी म्हटले आहे की, भारत स्वतः लढाऊ विमाने बनवण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. ते म्हणाले, ‘भारत पूर्णपणे स्वदेशी लढाऊ विमान विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘ही माहिती त्यांनी तामिळनाडूतील विरुधुनगर येथील शिवकाशीमध्ये एका कार्यक्रमात दिली.
या कार्यक्रमाचे नाव ‘यूथ अॅस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स काँग्रेस (YASSC) 2025’ असे होते. हा कार्यक्रम शिवकाशीमध्ये पहिल्यांदाच पार पडला. डॉ. विजयकुमार म्हणाले की, देशाला पुढे नेण्यासाठी संशोधन खूप महत्त्वाचे आहे. गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (GTRE) ‘कावेरी 2.0’ नावाने एक नवीन इंजिन तयार करत आहे. हे एक टर्बोफॅन इंजिन आहे. हे आधीच्या कावेरी इंजिनपेक्षा अधिक चांगले असेल, जे पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांसाठी तयार केले जात आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय असेल.
अमेरिकेच्या GE- F414 इंजिनसारखी क्षमता प्राप्त करणे हे GTRE चे लक्ष्य आहे. कावेरी 2.0 इंजिन कोर 55 ते 58 किलोन्यूटन (GTRE) दरम्यान थ्रस्ट निर्माण करण्यासाठी डिझाईन केले आहे. आफ्टरबर्नरसह (वेट थ्रस्ट) ते 90 किलोन्यूटनपेक्षा जास्त थ्रस्ट मिळवेल, अशी अपेक्षा आहे. भारत पाचव्या पिढीचे स्वदेशी ‘अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) तयार करत आहे. हे सिंगल-सीट, दोन इंजिन असलेले, सर्व हवामानांत उड्डाण करू शकणारे, बहुउद्देशीय स्टेल्थ लढाऊ विमान असेल.