Diamond Lotus | अंतरिक्षात चमकणार भारताचे ‘डायमंड लोटस’!

Diamond Lotus |
Diamond Lotus | अंतरिक्षात चमकणार भारताचे ‘डायमंड लोटस’!
Published on
Updated on

बंगळूर : भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्र सध्या जगभरात नाव कमावत आहे; परंतु यावेळी जी गोष्ट घडणार आहे, तिची कल्पना कदाचितच कोणी केली असेल! भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-१’ आपल्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे, या सफरीत त्याच्यासोबत कोणतीही सामान्य मशिन नसून, अंतराळात चमकण्यासाठी हिऱ्याचे एक अनोखे कमळ पाठवले जात आहे. बंगळूरमधील कुशल कारागिरांनी प्रयोगशाळेत हे मौल्यवान आणि अद्‌भुत कमळ तयार केले आहे. जाणून घेऊया, अनोख्या मिशनबद्दल आणि हे ‘डायमंड लोटस’ अंतराळात कसा इतिहास रचणार आहे...

बंगळूरमधील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड ‘कॉस्मस डायमंडस्‌’ने घोषणा केली आहे की, त्यांनी तयार केलेले एक अतिशय देखणे लॅब-ग्रोन डायमंड लोटस या ऐतिहासिक मोहिमेचा भाग असणार आहे. भारतात तयार झालेले ‘लॅब-ग्रोन’ (प्रयोगशाळेत विकसित केलेले) हिऱ्याचे कोणतेही कलाकुसर असलेले आर्टवर्क अंतराळ प्रवासावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नक्की काय पाठवावे, यावर अनेक महिने चर्चा सुरू होती. सुरुवातीला एखादा मोठा हिरा किंवा एखादा खास जेमस्टोन कट पाठवण्याचा विचार झाला; परंतु शेवटी भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाची निवड करण्यात आली. भारतीय संस्कृतीत आणि प्राचीन मंदिरांमध्ये कमळाला पवित्रता, निर्मिती आणि ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे. या डायमंड लोटसच्या केंद्रभागात सोन्याचा वापर करण्यात आला आहे, जो भारतीय संस्कृतीतील देवतांचे आसन दर्शवतो. हे कमळ केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर अंतराळातील अत्यंत खडतर वातावरणाचा सामना करण्यासाठी ते खास पद्धतीने डिझाईन केले गेले आहे. रॉकेट लाँचिंगच्या वेळी होणारे तीव्र कंपन आणि प्रचंड दाब सहन करण्यासाठी या डायमंड लोटसच्या अनेक कडक संरचनात्मक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हिरा ही जगातील सर्वात कठीण वस्तूंपैकी एक आहे. लाँचिंगदरम्यान या हिऱ्याचा एकही तुकडा वेगळा होणार नाही, याची इंजिनिअरनी पूर्ण काळजी घेतली आहे.

‘विक्रम-१’ रचणार इतिहास

हा अनोखा पेलोड घेऊन जाणारे ‘विक्रम-१’ रॉकेट ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या कंपनीने तयार केले आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्याचा प्रयत्न करणारे हे भारताचे पहिले खासगीरीत्या विकसित केलेले रॉकेट आहे. जरी हा हिरा कोणताही वैज्ञानिक पेलोड नसला, तरी अंतराळात भारतीय नवसंशोधन (Innovation), कारागिरी आणि संस्कृतीचा डंका वाजवण्यासाठी तो पाठवला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news