Jatinga Bird Mystery | भारतातील ‘या’ गावात दरवर्षी शेकडो पक्षी करतात ‘आत्महत्या’!

Jatinga Bird Mystery |
Jatinga Bird Mystery | भारतातील ‘या’ गावात दरवर्षी शेकडो पक्षी करतात ‘आत्महत्या’!
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भारतामध्ये अनेक निसर्गरम्य आणि गूढ स्थळे आहेत, ज्यांच्यामागील रहस्ये आजही उलगडलेली नाहीत. आसाममधील डिमा हासाओ जिल्ह्यातील ‘जातिंगा’ हे छोटेसे गाव अशाच एका विचित्र आणि थरकाप उडवणाऱ्या घटनेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या गावाला ‘पक्ष्यांचे आत्महत्येचे ठिकाण’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी ठराविक महिन्यात शेकडो पक्षी येथे येऊन रहस्यमयरीत्या आपला जीव देतात.

जातिंगा गावात ही गूढ घटना वर्षभर घडत नाही. दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान, विशेषतः अमावास्येच्या रात्री आणि धुक्याच्या वातावरणात हा प्रकार घडतो. संध्याकाळी ६.५० ते रात्री ९.३० या वेळात पक्षी विचित्र वर्तन करू लागतात. या काळात स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी अचानक प्रकाशाच्या दिशेने वेगाने आकर्षित होतात. ते झाडांवर, घरांवर, विजेच्या खांबांवर किंवा जमिनीवर वेगाने आदळतात आणि मृत्युमुखी पडतात. यात प्रामुख्याने किंगफिशर, टायगर बिटर्न आणि लिटल एग्रेट यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश असतो. सुरुवातीला स्थानिक लोकांमध्ये या घटनेबाबत विविध अंधश्रद्धा होत्या; मात्र पक्षीतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी यावर सखोल अभ्यास करून यामागील शास्त्रीय कारणे मांडली आहेत.

दिशाज्ञानातील गोंधळ : पावसाळ्याच्या शेवटी या भागात अचानक हवामानात बदल होतो. उंच टेकड्यांवरून वाहणारे वेगाने वारे आणि दाट धुक्यामुळे उडणाऱ्या पक्ष्यांची दिशाभूल होते. प्रकाशाचे आकर्षण : रात्रीच्या वेळी अचानक दिशा हरवलेले पक्षी जेव्हा गावात उजळणारे दिवे किंवा मशाली पाहतात, तेव्हा ते त्या प्रकाशाच्या दिशेने वेगाने झेपावतात आणि नियंत्रण सुटल्याने विविध वस्तूंवर आदळतात.

उड्डाणाची वेळ : सामान्यतः हे पक्षी रात्रीच्या वेळी उडणारे नसतात; परंतु अचानक आलेल्या वादळामुळे आणि वातावरण बदलामुळे त्यांची झोप विस्कळीत होऊन ते उडू लागतात. गेल्या काही वर्षांत पर्यावरणप्रेमी आणि प्रशासनाकडून जातिंगा गावात जागृती मोहीम राबवण्यात आली आहे. या काळात गावातील विजेचे दिवे मंद करणे आणि पक्ष्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करणे यामुळे या घटनेचे प्रमाण आधीपेक्षा काहीसे कमी झाले आहे. तरीही, निसर्गाची ही अजब घटना आज जगभरातील पर्यटकांसाठी आणि संशोधकांसाठी मोठे कुतूहल बनून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news