मॉस्को : आजकाल सायबर क्राइम एवढे वाढले आहेत की, कधी आपला डेटा चोरला जाईल, कधी आपल्या बचत खात्याची ऐसी तैशी होईल, हे कळणारही नाही, अशी अराजक स्थिती निर्माण होते आहे. बर्याच अंशी मानवी चुकाच याला कारणीभूत ठरतात. अशावेळी ओटीपी कोणाला सांगू नये, कुठेही शेअर करू नये, यासाठी शक्य तितकी जनजागृती केली जाते. आता अशा ओटीपीआधीही आपल्या पासवर्डबाबतही आपण तितकेच जागरुक असायला हवे, असेही सातत्याने दिसून येते आहे. यामुळे पासवर्ड कायम स्ट्राँग असायला हवा, मग तो सोशल मीडिया अकाऊंटचा असो किंवा बँक अकाऊंटचा असो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काहीजण आपली जन्मतारीखच पासवर्ड ठेवतात. काहीजण जवळच्या व्यक्तीची जन्मतारीख पासवर्ड ठेवतात. खरे तर यामागे कितीही भावनिक अर्थ असला तरी त्याचा कोणीही सहज अंदाज लावू शकतो. नॉर्डपासने अलीकडेच आपल्या वार्षिक रिसर्च टॉप 200 मोस्ट कॉमन पासवर्डस्चा सहावा भाग जाहीर केला. ज्यामध्ये 44 देशांमधील सर्वाधिक वापर झालेल्या पासवर्डची यादी जाहिर करण्यात आली. त्यानुसार, भारतात फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इत्यादींवर सर्वाधिक कोणते पासवर्ड वापरले जातात जाणून घेऊया. या अहवालानुसार, जगभरात दुसर्या क्रमांवर 123456789 हा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड आहे . यात भारत चौथ्या स्थानी आहे . भारतासह जगभरात पहिल्या क्रमांकावर ज्या पासवर्डचा सर्वाधिक वापर होतो तो आहे 123456. जगभरातील जवळपास 30,18,050 युजर्स हा पासवर्ड वापरतात. त्यात 76,981 युजर्स भारतातले आहेत. टॉप 10 कॉमन पासवर्डमध्ये त्यांचा समावेश आहे. रिपोर्टमधून असे देखील समोर आले आहे की, भारतातील लोक पासवर्ड हा शब्दच पासवर्ड म्हणून ठेवतात. हा पासवर्ड सोपा असला तरी त्याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. मात्र कॉमन असल्यामुळे हा पासवर्ड सायबर सुरक्षेच्या द़ृष्टीने धोक्याचे ठरू शकते. अनेकजण पासवर्ड भक्कम व्हावा यासाठी अंक आणि अक्षरे एकत्र ठेवतात. मात्र त्यातही एक पासवर्ड खूप कॉमन आहे. रिपोर्टनुसार, भारतात 1क्यू2डब्ल्यू3ई4आर5टी हा पासवर्ड अनेक लोक वापरतात, असेही यात नमूद आहे.