India Artificial Sun | भारताची ‘कृत्रिम सूर्य’ बनवण्याच्या दिशेने मोठी वाटचाल

ndia Artificial Sun |
India Artificial Sun | भारताची ‘कृत्रिम सूर्य’ बनवण्याच्या दिशेने मोठी वाटचाल
Published on
Updated on

गांधीनगर : चीनला तगडी टक्कर देत भारत आता पृथ्वीवर सूर्यासारखी अमर्याद ऊर्जा निर्माण करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. यासंदर्भात भारतीय शास्त्रज्ञ एका अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करत असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त आणि मुबलक वीज मिळण्याचा एक क्रांतिकारी पर्याय उपलब्ध होणार आहे.

गुजरातच्या गांधीनगर येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च’ (IPR) मधील भारताच्या ‘SST-1’ (Steady State Superconducting Tokamak) या फ्युजन रिसर्च मशिनमध्ये एक नवा आणि अधिक शक्तिशाली ‘गायरोट्रॉन’ (Gyrotron) बसवण्यात आला आहे. ही प्रणाली ८२.६ गिगाहर्ट्झ (GHz) फ्रिक्वेन्सी आणि ४०० किलोवॉट (kW) क्षमतेसह कार्य करते. अतीव उष्ण प्लाझ्मा अधिक तापवणे आणि त्याला दीर्घकाळापर्यंत नियंत्रित ठेवण्याची वैज्ञानिक क्षमता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चीनचा ‘EAST’ (Experimental Advanced Superconducting Tokamak) हा फ्युजन प्रकल्प जगभरात चर्चिला जात आहे. जानेवारी २०२५ मध्ये चीनने १० कोटी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेला प्लाझ्मा १,००० सेकंदांपेक्षा जास्त काळ स्थिर ठेवल्याचा दावा केला होता.

याशिवाय चीनकडे ‘HL-3’ हे दुसरे फ्युजन डिव्हाईस असून, त्याने इलेक्ट्रॉन तापमान १६ कोटी अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचवले होते. दुसरीकडे, भारतीय शास्त्रज्ञांनी यापूर्वीच फ्युजन प्रयोगांद्वारे २० कोटी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेला प्लाझ्मा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. हे तापमान सूर्याच्या केंद्रस्थानी असलेल्या तापमानापेक्षा जवळपास २० पटीने जास्त आहे. आता या नव्या गायरोट्रॉन सिस्टीममुळे प्लाझ्माला अधिक कार्यक्षमतेने हाताळणे आणि त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणे भारताला शक्य होणार आहे. सूर्याच्या पोटात प्रचंड तापमान आणि दाबामुळे हायड्रोजनचे अणू एकमेकांमध्ये मिसळतात (अणुसंलयन किंवा न्यूक्लियर फ्युजन - Nuclear Fusion). या प्रक्रियेतूनच अफाट ऊर्जा तयार होते. शास्त्रज्ञांना सूर्यावर होणारी हीच प्रक्रिया पृथ्वीवर ‘टोकामाक’ नावाच्या एका डोनटच्या आकाराच्या महाकाय मशिनमध्ये नियंत्रित पद्धतीने घडवून आणायची आहे.

‘कृत्रिम सूर्या’चा उपयोग

आज विजेच्या निर्मितीसाठी कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या पारंपरिक इंधनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे मोठे प्रदूषण होते. मात्र, न्यूक्लियर फ्युजन तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाची समस्या कायमची संपुष्टात येईल. कोळशावरील अवलंबित्व संपून भविष्यात अत्यंत स्वस्त दरात २४ तास अखंडित वीज उपलब्ध होऊ शकेल. जरी SST-1 हे सध्या एक प्रायोगिक (Experimental) यंत्र असले आणि व्यावसायिक स्तरावर वीज निर्माण करण्यास अद्याप काही कालावधी लागणार असला, तरी प्लाझ्माला नियंत्रित ठेवण्याच्या दिशेने भारताने टाकलेले हे पाऊल भविष्यात करोडो घरांना सक्षम आणि स्वच्छ ऊर्जेने उजळवून टाकणारे ठरेल.

logo
Pudhari News
pudhari.news