

लंडन : भारत आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञ मिळून अशी एक तंत्रज्ञानात्मक प्रणाली विकसित करत आहेत, ज्याद्वारे शरीराच्या आत अत्यंत सूक्ष्म रोबोंना चुंबकाच्या मदतीने नियंत्रित करता येईल. हे नॅनोरोबो शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचण्यास, सोबत आवश्यक घटक वाहून नेण्यास आणि ठरलेल्या ठिकाणी ते सोडण्यास सक्षम ठरू शकतात. यामुळे भविष्यात गंभीर आजारांवर उपचार करताना औषधे थेट बाधित भागापर्यंत पोहोचवण्यास मदत मिळू शकेल.
या प्रकल्पावर ब्रिटनमधील इम्पीरियल कॉलेज लंडन आणि बंगळूरु येथील भारतीय विज्ञान संस्था (IISc) या दोन्ही संस्थांचे शास्त्रज्ञ एकत्र काम करत आहेत. इम्पीरियल कॉलेजने या भागीदारीची घोषणा याच आठवड्यात केली आहे. या संशोधनात सिंथेटिक बायोलॉजी आणि नॅनोरोबोटिक्स यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अत्यंत लहान चुंबकीय मोटर्स बसवलेल्या कृत्रिम पेशी तयार करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या मोटर्स लहान इंजिनाप्रमाणे काम करतील आणि खडतर जैविक वातावरणातही कृत्रिम पेशींना पुढे जाण्यास मदत करतील.
कृत्रिम पेशी म्हणजे अशा संरचना असतात, ज्या शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत तयार करतात. यांमध्ये सजीव पेशींचे काही खास गुणधर्म आणि काम करण्याची क्षमता असते. मात्र, बहुतांश कृत्रिम पेशी स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत किंवा स्वतःच्या मर्जीने ठरलेल्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. पॉलिमरपासून बनवलेल्या लहान पिशव्यांमध्ये म्हणजेच 'वेसिकल्स'मध्ये चुंबकीय नॅनोमोटर्स बसवून शास्त्रज्ञ आता ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रकल्पात भारतीय विज्ञान संस्थेचे प्राध्यापक अंबरिश घोष यांचे पथक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांचे पथक चुंबकीय नॅनोरोबोंवर काम करत आहे. संशोधकांनी अशा प्रणाली विकसित केल्या आहेत, ज्या मानवी रक्त, ऊती आणि अगदी सजीव पेशींच्या आतही प्रवेश करू शकतात.
प्राध्यापक घोष यांच्या मते, त्यांच्या पथकाने गुंतागुंतीच्या जैविक वातावरणात चुंबकीय नॅनोरोबोंना नियंत्रित करणे शिकून घेतले आहे. मात्र, हे रोबो मूळात अकार्बनिक पदार्थांपासून बनलेले असतात. दुसरीकडे, इम्पीरियल कॉलेजच्या डॉ. क्लाउडिया कॉन्टिनी यांचे पथक कृत्रिम पेशींवर काम करत आहे. या पेशी स्वतःमध्ये सामग्री साठवून ठेवण्यास आणि गरज पडल्यास ती बाहेर सोडण्यास सक्षम ठरू शकतात. दोन्ही तंत्रज्ञाने एकत्र करून अशी प्रणाली तयार करण्याची योजना आहे, जी चुंबकाच्या मदतीने एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचवता येईल आणि तिथे ठरवलेले काम करून घेता येईल. यामुळे औषधाचा कमी डोस वापरण्याची शक्यता वाढू शकते आणि नको असलेले दुष्परिणामही कमी होऊ शकतात.