

नवी दिल्ली : मधुमेहाच्या निदानानंतर केवळ 3-5 वर्षांत तरुणांमध्ये डायबिटिक रेटिनोपथीचा धोका लक्षणीय वाढत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने 40 वर्षांवरील रुग्णांमध्ये आढळायचा, मात्र आता 40 वर्षांखालील लोकांमध्येही याची संख्या वाढली आहे. अनियमित जीवनशैली, उच्च रक्तसाखर, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मूत्रपिंड विकार यांसारख्या घटकांमुळे या आजाराची तीव्रता अधिक वाढत आहे. सुमारे 12-15 टक्के मधुमेहींना रेटिनोपथीचा त्रास होतो, त्यापैकी 4-5 टक्के रुग्णांची स्थिती गंभीर बनते आणि द़ृष्टीला धोका निर्माण होतो. अनेक रुग्ण फक्त द़ृष्टी गमावल्यावरच उपचारासाठी पुढे येतात, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले आहे.
डायबीटिक रेटिनोपथी ही अशी स्थिती आहे ज्यात रक्तातील साखरेच्या जास्त प्रमाणामुळे डोळ्यांच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचते. सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांना धुसर द़ृष्टी, डोळ्यांसमोर ठिपके, रंग ओळखण्यात अडचण आणि रात्रीच्या द़ृष्टीत कमकुवतपणा जाणवतो. हलक्या स्वरूपात असल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवून आजारावर ताबा ठेवता येतो, परंतु गंभीर अवस्थेत लेझर उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते.
उशिरा निदानामुळे अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत येतात. मधुमेही, उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंड विकार असलेल्या लोकांनी डोळ्यांची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. लवकर निदान केल्यास द़ृष्टी जपणे शक्य आहे.
सावधगिरीचे उपाय : मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करावी. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा मूत्रपिंड विकार असणार्यांनी विशेष लक्ष ठेवावे. धुसर दिसणे, ठिपके, प्रकाशाची चमक किंवा रंग ओळखण्यात अडचण जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.