Planet beyond Pluto | प्लुटोपलीकडील बर्फाळ ग्रहावर ‘अशक्य’वाटणारे वातावरण

Planet beyond Pluto |
Planet beyond Pluto | प्लुटोपलीकडील बर्फाळ ग्रहावर ‘अशक्य’वाटणारे वातावरण
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेच्या टोकावर, जिथे कडाक्याची थंडी आणि अंधार आहे, तिथे शास्त्रज्ञांना एक असा शोध लागला आहे, ज्याने जुन्या सिद्धांतांना आव्हान दिले आहे. प्लुटोच्या कक्षेच्या पलीकडे असलेल्या एका लहान बर्फाळ खगोलीय वस्तूवर वातावरण असल्याचे पुरावे जपानी खगोलशास्त्रज्ञांना सापडले आहेत. वास्तविक, विज्ञानाच्या नियमांनुसार तिथे वातावरण असणे अशक्य मानले जात होते.

‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात 4 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ‘क्युपर बेल्ट’मध्ये असलेल्या या वस्तूभोवती हवेचा एक पातळ थर आढळला आहे. ज्या खगोलीय वस्तूवर हे वातावरण आढळले आहे, तिला शास्त्रज्ञांनी (612533) 2002 दत93 असे नाव दिले आहे. या शोधाने शास्त्रज्ञांना चकित करण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत : आकार आणि थंडी : या वस्तूचा व्यास साधारण 311 मैल (500 किलोमीटर) आहे. ही वस्तू प्लुटोपेक्षा चारपट लहान आहे.

इतक्या लहान आकाराच्या आणि अतिशय थंड असलेल्या वस्तूमध्ये स्वतःचे वातावरण टिकवून ठेवण्याची गुरुत्वाकर्षण शक्ती नसते, असा आजवरचा समज होता. प्लुटोचा विक्रम मोडीत : आतापर्यंत असे मानले जात होते की, नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे फक्त ‘प्लुटो’ हा एकमेव असा ग्रह आहे, ज्याला स्वतःचे वातावरण आहे. मात्र, या नवीन शोधामुळे ही धारणा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा शोध अत्यंत महत्त्वाचा असला, तरी तो पूर्णपणे स्वीकारण्यापूर्वी इतर जागतिक तज्ज्ञांकडून त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

‘नासा’च्या ‘न्यू होरायझन्स’ मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ अ‍ॅलन स्टर्न यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘हा एक थक्क करणारा विकास आहे. परंतु, स्वतंत्र पडताळणीची मोठी गरज आहे. जर याला पुष्टी मिळाली, तर त्याचे परिणाम खूप सखोल असतील.’ हे वातावरण नेमके कशाचे बनलेले आहे आणि ते तिथे कसे टिकून आहे, हे शोधण्यासाठी आता ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’द्वारे या वस्तूचे निरीक्षण करण्याची मागणी संशोधक करत आहेत. कुइपर बेल्ट हा नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडे असलेला सूर्यमालेचा असा भाग आहे, जो बर्फाळ वस्तू आणि लघुग्रहांनी भरलेला आहे. याला सूर्यमालेची ‘तिसरी सीमा’ असेही म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news