देशात कोरोनापाठोपाठ आता ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीचे रुग्णही वाढत आहेत. त्याचे कारण म्हणजे कमजोर झालेली रोगप्रतिकारक क्षमता. घरात राहूनही आहाराच्या माध्यमातून आपण रोगप्रतिकारक क्षमता बर्याच अंशी वाढवू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. काढा आणि आयुर्वेदिक चहा यासाठीचा चांगला उपाय आहे. तुळशी, अश्वगंधा, मसाला आणि लेमन-टी असा चार प्रकारचा चहा याबाबत गुणकारी ठरतो. लखनौच्या 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड एरोमॅटिक प्लँटस्'मधील तज्ज्ञ आशिष कुमार यांनी दिलेली ही माहिती…
तुळशी चहा ः
हा चहा कफ, खोकला, सर्दी आणि अस्थमा (दमा) या समस्यांमध्ये गुणकारी ठरतो. हा चहा बनवण्यासाठी तुळशीची ताजी पाने किंवा, वाळवलेली पाने तसेच पावडरही वापरता येते. या चहामध्ये असे घटक असतात जे कफ आणि बेडका यांच्यापासून सुटका करवून देतात. या चहामध्ये अँटिसेप्टिक, अँटिऑक्सिडंटस् आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात. आठ ते दहा तुळशीची पाने उकळलेल्या पाण्यात टाकून व त्यामध्ये थोडे आले व वेलची पावडर मिसळून असा चहा बनवतात. दहा मिनिटे तो उकळू दिल्यावर त्यामध्ये मध किंवा लिंबूचा रस टाकून प्यावा. या चहामध्ये दूध किंवा साखर टाकू नये. त्यामुळे त्याचे औषधी गुण घटतात.
अश्वगंधा चहा ः
या चहामुळे सूज आणि संक्रमण घटण्यास मदत मिळते. अश्वगंधा ही एक वनौषधी आहे. तिच्या मुळींचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. मात्र, हल्ली त्याच्या पानांचा चहा बनवण्याची पद्धत वाढली आहे. आयुर्वेदानुसार अश्वगंधाची मुळी किंवा पानांपासून बनवलेला चहा पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. अश्वगंधाच्या मुळांमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटिव्हेनम, अँटिइन्फ्लेमेट्री आणि अँटिट्यूमर गुण असतात. हा चहा बनवण्यासाठी अश्वगंधाची मुळी, मध आणि लिंबू वापरला जातो. एक पेला पाण्यात एक इंच लांब अश्वगंधाची मुळी टाकून पाणी उकळावे. ते गाळून कपात ओतल्यावर त्यामध्ये चमचाभर मध आणि स्वादानुसार लिंबूचा रस टाकून प्यावा.
लिंबू चहा ः
डोकेदुखी, घशातील खवखव आणि सूज दूर करण्यासाठी लिंबूचा चहा गुणकारी असतो. यामध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात. जीवाणू किंवा विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो. लेमन-टीमध्ये चहा पावडर, लिंबूचा रस आणि साखर यांचा वापर होतो. लिंबूमुळे स्वादही येतो आणि रंगही बदलतो. या चहामध्ये 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. सर्दी-खोकल्यावरही ते गुणकारी आहे. लेमन ग्रासपासूनही लेमन-टी बनवला जातो.
मसाला चहा ः
बुरशी आणि जीवाणूंच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी हा चहा उपयुक्त आहे. चहाच्या शौकिनांना मसाला चहा आवडतोच. उकळत्या पाण्यात चहा पावडर आणि दूध टाकल्यानंतर त्यामध्येच काळी मिरी, सुंठ, तुळस, दालचिनी, वेलची, लवंग, जायफळ आदी पदार्थ टाकून चहा उकळून घ्यावा. या चहाची चवही चांगली लागते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अनेक प्रकारच्या संक्रमणापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरू शकतो.