

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एका रोमन काळातील ममीचा शोध लावला आहे, ज्याच्या पोटात होमरच्या प्रसिद्ध ‘इलियड’ या महाकाव्याची प्रत सापडली आहे. पुरातत्त्वशास्त्राच्या इतिहासातील ही एक अत्यंत दुर्मीळ आणि ‘असाधारण’ घटना असल्याचे मानले जात आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पॅपिरसवर ग्रीक भाषेत लिहिलेला हा मजकूर ‘इलियड’मधील दुसर्या भागाचा (बुक-2) अंश आहे. यात पौराणिक ट्रोजन युद्धाचे सविस्तर वर्णन असून, ट्रॉय शहरावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या जहाजांची यादी देण्यात आली आहे. मृतदेहाचे ममीमध्ये रूपांतर करण्याच्या विधीदरम्यान हा मजकूर जाणीवपूर्वक पोटाच्या भागात ठेवला गेला असावा. ही ममी इजिप्तमधील आधुनिक अल-बनास शहरात सापडली आहे, जे प्राचीन काळी ‘ऑक्सिरिंचस’ म्हणून ओळखले जात असे. हा काळ असा होता जेव्हा इजिप्तवर रोमन साम—ाज्याचे नियंत्रण होते.
इसवी सन पूर्व 30 मध्ये क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर रोमन सत्ता सुरू झाली आणि ती इसवी सन 641 पर्यंत टिकली. ऑक्सिरिंचस येथे गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ उत्खनन सुरू आहे. 19 व्या आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला येथे पॅपिरसचे सुमारे 5 लाख तुकडे सापडले होते. या मोहिमेच्या सहसंचालिका एस्थर पोन्स मेल्लाडो यांनी सांगितले की, ‘मृताला परलोकात संरक्षण मिळावे, या उद्देशाने हा पॅपिरस पोटावर ठेवण्यात आला होता.’ रोमन्सच्या काळात छातीवर किंवा पोटावर असे कागद ठेवण्याची प्रथा होती. मात्र, त्यासाठी साहित्यकृतीचा वापर का केला जात असे, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या शोधाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ममीच्या आत होमरच्या ‘इलियड’ची प्रत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बार्सिलोना विद्यापीठातील भाषाशास्त्राचे प्राध्यापक इग्नासी-झेवियर एडिएगो यांच्या मते, आतापर्यंत ममीच्या आत केवळ जादू-टोण्याशी संबंधित धार्मिक मजकूर सापडत असे. मात्र, ममीकरण प्रक्रियेत ग्रीक साहित्याचा असा वापर होणे ही पूर्णपणे नवीन आणि ऐतिहासिक बाब आहे.