

नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीच्या सोनिपत कॅम्पसमध्ये विकसित करण्यात आलेला ‘परम प्रज्ञा’ या एआय संचालित हाय-परफॉर्मन्स सुपरकॉम्प्युटिंग सिस्टीमबाबत लोकांना उत्सुकता आहे. हा सुपरकॉम्प्युटर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा सायन्स, प्रगत संगणन (Advanced Computing) आणि विविध आंतरशाखीय संशोधनाला (Interdisciplinary Research) नवी गती देण्यासाठी सज्ज करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, लाँग लँग्वेज मॉडेल्स, डेटा सायन्स आणि वैज्ञानिक संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर संगणकीय क्षमतेची गरज भासत असतानाच ‘परम प्रज्ञा’ लाँच केला जात आहे. त्यामुळे हा सुपरकॉम्प्युटर नक्की काय आहे आणि तो सामान्य संगणकापेक्षा कसा वेगळा आहे, ते जाणून घेऊया.
‘परम प्रज्ञा’ ही आयआयटी दिल्लीच्या सोनिपत कॅम्पसमध्ये स्थापित केलेली एआय संचालित हाय परफॉर्मन्स संगणकीय प्रणाली (HPC) आहे. अत्यंत कठीण आणि प्रचंड मोठ्या संगणकीय कामांना वेगाने पूर्ण करण्यासाठी संशोधकांना उच्च दर्जाची संगणक क्षमता उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. साध्या संगणकामध्ये एखादे काम करण्यासाठी मोजकेच ‘सीपीयू कोअर्स’ असतात. सुपरकॉम्प्युटरमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या प्रोसेसिंग युनिटस्ना एकत्र जोडले जाते आणि मोठ्या कामाची छोट्या-छोट्या भागांत विभागणी केली जाते. या युनिटस् एकाचवेळी वेगवेगळ्या भागांवर काम करतात आणि शेवटी सर्व निकालांचे एकत्रीकरण करतात. मोठ्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी अब्जावधी डेटा पॉईंटस् आणि गणिते करावी लागतात. एचपीसी सिस्टीम ही गणिते एकाचवेळी करून कामाचा वेळ प्रचंड प्रमाणात कमी करते. साधारणत:, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर हे प्रामुख्याने रोजच्या सामान्य कामांसाठी बनवले जातात; जसे की इंटरनेट ब्राऊझिंग, व्हिडीओ एडिटिंग, ऑफिसचे काम, कोडिंग किंवा सामान्य प्रोग्राम चालवणे. याउलट, सुपरकॉम्प्युटरचे मुख्य उद्दिष्ट अत्यंत मोठ्या प्रमाणावर गणिते आणि प्रक्रिया करणे हे असते.
‘परम प्रज्ञा’ची मोठी वैशिष्ट्ये :
एआय संशोधनासाठी विशेष क्षमता : ही सुविधा एआय आणि डेटा सायन्ससारख्या जास्त संगणकीय क्षमतेची गरज असणाऱ्या क्षेत्रांतील संशोधनाला गती देईल. यामुळे संशोधकांना मोठ्या एआय मॉडेल्सवर आणि जटिल मशिन लर्निंग प्रयोगांवर काम करणे सोपे जाईल.
हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग : सामान्य संगणकावर ज्या गणितांना आणि प्रक्रियांना पूर्ण होण्यासाठी कित्येक दिवस किंवा महिने लागू शकतात, ती कामे हा सुपरकॉम्प्युटर अगदी चुटकीसरशी पूर्ण करू शकतो.
मोठा डेटा वेगाने प्रोसेस करण्याची क्षमता : वैज्ञानिक संशोधन आणि एआय क्षेत्रात अजस्र डेटा सेटवर काम करावे लागते. हा सुपरकॉम्प्युटर प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करून गुंतागुंतीचे मॉडेल्स चालवण्यास मदत करतो.
अनेक क्षेत्रांत एकाचवेळी वापर : याचा वापर फक्त संगणकशास्त्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर अभियांत्रिकी, विज्ञान, औषधनिर्माण आणि इतर सर्व आंतरशाखीय संशोधनांमध्येही याची क्षमता वापरली जाऊ शकते.