

न्यूयॉर्क : वैज्ञानिकांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने एका मोठ्या शोधात, आपल्या सूर्यासारख्या दूरच्या एका तार्याभोवती पाण्याच्या बर्फाचे कण आणि धूळ असल्याचे शोधले आहे. खगोलशास्त्रज्ञांना याआधीपासूनच शंका होती की, पाणी, विशेषत: गोठलेल्या स्वरूपात, आपल्या सौर मंडळात आढळते. कारण शनि ग्रहाचा उपग्रह एन्सेलाडस, गुरूचे गॅनिमेड, युरोपा आणि इतर बर्फाळ उपग्रहांमध्ये मोठ्या प्रमाणात गोठलेले पाणी आहे. शास्त्रज्ञांना असेही वाटते की यापैकी काही उपग्रहांमध्ये सबसरफेस ओशियन देखील असू शकतात, ज्यामुळे तेथे जीवनाची शक्यता आहे.
जेम्स वेबने केलेल्या नवीन संशोधनानुसार, शास्त्रज्ञांना हे समजण्यास मदत होईल की पाणी इतर ग्रह प्रणालींमध्ये कसे वितरीत केले जाते. हे संशोधन एचडी 181327 नावाच्या एका तार्याभोवती केंद्रित आहे, जो सुमारे 155 प्रकाशवर्षे दूर टेलिस्कोपियम नावाच्या कॉन्स्टेलेशनमध्ये आहे. एचडी 181327 हा तारा 23 दशलक्ष वर्षांचा आहे, जो आपल्या 4.6 अब्ज वर्षांच्या सूर्याच्या तुलनेत खूप लहान आहे. या तार्याच्या भोवती धूळ आणि लहान कणांचा एक मोठा डिस्क आहे, जो ग्रहांचे बिल्डिंग ब्लॉक आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधक क्रिस्टीन चेन यांनी नासाच्या निवेदनात म्हटले आहे की एचडी 181327 ही एक अतिशय सक्रिय प्रणाली आहे. या डिस्कमधील बर्फाळ वस्तूंमध्ये सतत टक्कर होत असल्यामुळे पाण्याच्या बर्फाचे बारीक कण तयार होतात, जे वेब दुर्बिणीने शोधण्यासाठी योग्य आहेत.
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, बर्फ आणि धूळ यांचे हे कण भविष्यात तयार होणार्या खडकाळ ग्रहांना पाणी पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जेव्हा ग्रह डिस्कच्या आत आकार घेतात, तेव्हा धूमकेतू आणि इतर बर्फाळ वस्तू तरुण जगांवर आदळू शकतात आणि त्यांच्यावर पाण्याची वृष्टी करू शकतात. याच प्रक्रियेमुळे पृथ्वीवर पाणी आले आणि जीवनासाठी आवश्यक वातावरण तयार झाले, असे मानले जाते.