

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील ‘सर्वात धोकादायक ग्लेशियर’ म्हणून ओळखल्या जाणार्या प्रदेशात बर्फ वितळण्याऐवजी वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे जग ग्लोबल वॉर्मिंग आणि वितळणार्या हिमनद्यांच्या चिंतेत असताना, शास्त्रज्ञांना ही माहिती मिळाली आहे, त्यामुळे हवामान बदलाच्या (क्लायमेंट चेंज) सिद्धांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्यांसाठी एकप्रकारे हातात कोलीत मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाने (आयएसएस अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन 2023 मध्ये काढलेल्या एका छायाचित्राच्या आधारावर, जगभरातील संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे की आशियातील काराकोरम पर्वतरांगेतील तीन हिमनद्या (ग्लेशियर) एकत्र येत असून त्यांचा आकार वाढत आहे. नासाच्या या फोटोमध्ये लोलोफोंड आणि तेरम शेहर या हिमनद्या हळूहळू सियाचीन ग्लेशियरमध्ये विलीन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भारत, पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेला हा प्रदेश भारत-पाकिस्तान संघर्षामुळे ‘जगातील सर्वात धोकादायक ग्लेशियर’ म्हणून ओळखला जातो. जगभरातील बहुतेक हिमनद्या तापमानवाढीमुळे कमी होत असताना, येथील हिमनद्या मात्र वाढत आहेत. या अनाकलनीय घटनेला शास्त्रज्ञ ‘काराकोरम विसंगती’ म्हणतात. विशेष म्हणजे, अंटार्क्टिकामध्येही गेल्या काही वर्षांपासून बर्फ वितळण्याचा वेग कमी होऊन तो विक्रमी पातळीवर तयार होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता काराकोरममधील ही घटना हवामान बदलाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.1990 च्या दशकापासून शास्त्रज्ञ या ‘विसंगती’चा अभ्यास करत आहेत, पण हिमनद्या का वाढत आहेत याचे ठोस कारण अद्याप सापडलेले नाही.