

थिरुवनंतपुरम : पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगांमध्ये निसर्गप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. हिमयुगाचा ‘जिवंत अवशेष’ मानल्या जाणार्या ‘क्रोकोथेमिस एरिथ्रिया’ या दुर्मीळ चतुर (ड्रॅगनफ्लाय) प्रजातीच्या अस्तित्वाला अभ्यासकांनी (ऑडोनॅटोलॉजिस्ट) पुन्हा एकदा दुजोरा दिला आहे. अनेक वर्षांपासून ही प्रजाती नजरेआड होती किंवा तिची चुकीची ओळख पटवली जात होती.
यापूर्वी, ही प्रजाती तिच्यासारख्याच दिसणार्या आणि सखल प्रदेशात सर्वत्र आढळणार्या ‘क्रोकोथेमिस सर्व्हिलिया’ या प्रजातीमध्ये गणली जात होती. दोन्ही प्रजातींमधील सूक्ष्म साम्यामुळे तिची स्वतंत्र ओळख दुर्लक्षित राहिली होती. ‘क्रोकोथेमिस सर्व्हिलिया’ ही प्रजाती पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आणि मैदानी प्रदेशात सहज आढळते, तर ‘क्रोकोथेमिस एरिथ्रिया’ केवळ उंच आणि थंड हवामानाच्या प्रदेशातच आपले अस्तित्व टिकवून आहे.
अलीकडील सखोल संशोधनातून अभ्यासकांनी हे सिद्ध केले आहे की, उंच पर्वतीय प्रदेशात आढळणारी ही प्रजाती वेगळी आणि अत्यंत दुर्मीळ आहे. ‘क्रोकोथेमिस एरिथ्रिया’ ही कमी तापमानात आणि विशिष्ट वातावरणातच टिकून राहते, ज्यामुळे तिला ‘हिमयुगाचा जिवंत अवशेष’ असे म्हटले जाते. असे मानले जाते की, हजारो वर्षांपूर्वी हिमयुगानंतर जेव्हा हवामान बदलले, तेव्हा या प्रजातीने उंच आणि थंड प्रदेशात आश्रय घेतला आणि ती आजतागायत तिथेच टिकून आहे.
या पुनर्शोधामुळे पश्चिम घाटाच्या समृद्ध आणि अद्वितीय जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. उंच पर्वतीय प्रदेशातील संवेदनशील पर्यावरण आणि तेथील दुर्मीळ जीवसृष्टीच्या संवर्धनाची गरज या शोधामुळे अधोरेखित झाली आहे. निसर्गाच्या या विशाल खजिन्यात अजूनही अनेक रहस्ये दडलेली आहेत, हेच या महत्त्वपूर्ण घटनेतून सिद्ध होते.