Dangerous Roads | या रस्त्यावर येतात शेकडो साप; रोडच होतो बंद!

Dangerous Roads |
Dangerous Roads | या रस्त्यावर येतात शेकडो साप; रोडच होतो बंद!
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : तुम्ही कधी केवळ सापांमुळे रस्ता बंद केल्याचं ऐकलंय का? अमेरिकेत असा एक रोड आहे, जिथे शेकडो साप रस्त्यावर येतात. त्यामुळे वर्षातून चार महिने हा रस्ताच बंद करावा लागतो. वाहनांना ‘नो एन्ट्री’ असते. या रस्त्यावरून गाड्या चालवल्या तर साप चिरडण्याची शक्यता असते. तसेच एखाद्याच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते त्यामुळे हा रस्ता बंद केला जातो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सापच साप पाहून अनेकांचा थरकाप उडतो. काही लोक तर या परिसरात यायलाही टरकतात.

अमेरिकेच्या इलिनोइस राज्यातील शॉनी नॅशनल फॉरेस्टमधून हा रस्ता जातो. या रस्त्याला ‘स्नेक रोड’ असं नाव देण्यात आलं आहे. या रस्त्याचं अधिकृत नाव ‘फॉरेस्ट सर्व्हिस रोड ३४५’ आहे. सुमारे चार किलोमीटर रस्त्याला ‘ला-रू रोड’ असंही म्हटलं जातं. या रस्त्याच्या बाजूला चुन्याचे दगड असून, हा दलदलीचा भाग आहे. या संपूर्ण परिसरात सापांशिवाय इतर अनेक वन्यजीव आहे. हवामान बदलताच या जीवांचं ठिकाणही बदलतं. या भागात असणारे साप आणि इतर जीव वर्षातून दोनदा आपलं ठिकाण बदलतात.

थंडीच्या दिवसात हे जीव चुन्याच्या दगडावर किंवा डोंगरावर जातात. सुरक्षित राहण्यासाठी ते हा पर्याय निवडतात. उन्हाळ्यात हे जीवजंतू दलदलीकडे जातात. त्यानंतर पुन्हा हिवाळ्यात ते डोंगरावर जातात. या दोन्ही ठिकाणाच्या मधोमध रस्ता आहे. हा रस्ता पार करूनच त्यांना आपल्या इच्छित स्थळी जावं लागतं. साप आणि इतर जीव त्यामुळेच रस्ता पार करण्यासाठी रस्त्यावर येतात. मोठ्या प्रमाणावर साप रस्त्यावर येत असल्याने गाडीखाली येतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळेच अमेरिकेच्या वन विभागाने हा रस्ता वर्षातून दोनदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधी १५ मार्च ते १५ मे पर्यंत रस्ता बंद असतो. यावेळी जीवजंतू डोंगराळ भागातून निघून दलदलीकडे जात असतात. त्यानंतर १ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत रस्ता बंद असतो. यावेळी पुन्हा दलदलीकडून डोंगराळ भागाकडे हे जीवजंतू जात असतात. अशा पद्धतीने वर्षातून आठ महिने रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, जेव्हा रस्ता बंद असतो तेव्हा या भागात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. कोणी या भागात फिरकणार नाही याची काळजी घेतली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.