

न्यूयॉर्क : फिलाडेल्फिया झूमध्ये चार दुर्लभ पिल्लांनी अलीकडेच पहिल्यांदा जनतेसमोर आपली झलक दाखवली. विशेष म्हणजे ही पिल्लं 100 वर्षांच्या आई ‘मॉमी’ या कासवाची पहिलीच अपत्यं आहेत! मॉमी ही वेस्टर्न सांताक्रूझ गॅलापागोस जातीची कासव (Chelonoidis niger porteri) असून ती अलीकडेच या प्रजातीतील सर्वांत वयस्क पहिल्या वेळची आई ठरली आहे. तिचे नेमके वय माहीत नसले तरी ती सुमारे 100 वर्षांची आहे आणि गेली 90 वर्षे ती फिलाडेल्फिया झूमध्ये राहात आहे.
फिलाडेल्फिया झूच्या 150 वर्षांच्या इतिहासात प्रथमच वेस्टर्न सांताक्रूझ गॅलापागोस जातीच्या कासवांची यशस्वी पैदास झाली आहे. ही प्रजाती गॅलापागोस बेटांमध्ये अत्यंत दुर्मीळ स्थितीत आहे आणि अमेरिकेतील झूमध्ये फक्त 50 पेक्षा कमी अशी कासवं आहेत. एप्रिल 23 रोजी, मॉमीच्या या चार पिल्लांना झूमधील ‘Reptile and Amphibian House’ मध्ये जनतेसमोर आणण्यात आले. याच दिवशी मॉमीला झूमध्ये आणून 93 वर्षे पूर्ण झाली. या खास प्रसंगी, फिलाडेल्फिया झूने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत म्हटलं, ‘त्या अखेर इथे आहेत! मॉमीच्या चार सुंदर मुली आज पहिल्यांदाच सर्वांसमोर आल्या.
गॅलापागोस कासव ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी कासव प्रजाती मानली जाते. यातील नर सुमारे 1.8 मीटर (6 फूट) लांब आणि 570 पौंड (260 किलोग्रॅम) वजनाचे होऊ शकतात. माणसांच्या हस्तक्षेपामुळे अनेक गॅलापागोस कासव प्रजाती नामशेष झाल्या आहेत. वेस्टर्न सांताक्रूझ जातीच्या कासवांची संख्या काही हजारांपर्यंतच मर्यादित आहे. मांसासाठी केलेली शिकार, तसेच उंदरांसारख्या परप्रांतीय प्रजातींमुळे त्यांच्या अंड्यांना आणि पिल्लांना धोका निर्माण झाला आहे, असे आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघटनेने नमूद केले आहे. मॉमी आणि तिच्या चार पिल्लांनी आता नव्या आशेचा किरण निर्माण केला आहे.