

जोहान्सबर्ग ः दक्षिण आफ्रिकेत मानवी इतिहासातील सर्वांत लहान नातेवाईकांपैकी एकाचा शोध लागला आहे. परँथ्रोपस रोबस्टस नावाच्या या प्राचीन मानवसद़ृश प्राण्याची उंची फक्त 3 फूट 4.5 इंच (1.03 मीटर) होती. सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी मृत्यू पावलेला हा प्राणी, इथिओपियातील प्रसिद्ध ‘ल्युसी’ किंवा इंडोनेशियातील छोट्या ‘हॉबिटस्’ पेक्षाही लहान होता; मात्र तो इतका ठेंगणा का होता, हे संशोधक अजून निश्चित सांगू शकलेले नाहीत.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील पुराजीवशास्त्रज्ञ ट्रॅव्हिस पिकरिंग यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांनी हा शोध लावला आहे. ‘हे छोटे पुरामानव त्यांच्या शरीरयष्टीच्या द़ृष्टीने आधुनिक पिग्मी (लहान वाढीचे मानव) पेक्षा अधिक ठेंगणे आणि मजबूत असू शकतात,’ असे पिकरिंग यांनी सांगितले. ही नवीन सापडलेली व्यक्ती डथढ1/ कठ-2 या कोडनेमने ओळखली जाते. हिच्या शोधामुळे पी. रोबस्टस प्रजाती कशाप्रकारे चालत होते यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेतील स्वार्टक्रान्स चुनखडी गुहेत उत्खनन केले. हे ठिकाण ‘क्रेडल ऑफ ह्युमनकाइंड’ या जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे. तिथून 1.7 ते 2.3 दशलक्ष वर्षे जुन्या खडकांच्या गाठी मिळाल्या. प्रयोगशाळेत त्यांचे परीक्षण करताना डावे नितंब हाड, मांड्याचे हाड (फेमर) आणि पायाचे हाड (टिबिया) यांचा समावेश असलेली हाडे एका व्यक्तीची असल्याचे आढळले. हाडांच्या आकारावरून संशोधकांनी हा एक तरुण प्रौढ स्त्रीसद़ृश प्राणी असल्याचे ठरवले. पी. रोबस्टस ही ‘मजबूत ऑस्ट्रेलोपिथेसिन’ म्हणून ओळखली जाते, कारण हिचे दात आणि चेहरा मोठा होता. या प्रजातीच्या संपूर्ण शरीराचे फारसे जीवाश्म मिळालेले नाहीत, त्यामुळे या शोधाला विशेष महत्त्व आहे. संशोधनातून असे दिसून आले की, हा प्राणी दोन पायांवर चालत होता तसेच झाडांवर चढण्यातही तो कुशल असावा. त्याच्या कंबरेचे आणि नितंबांचे हाड मोठे आणि मजबूत होते, पण पायाचे हाड तुलनेने सडपातळ होते. यामुळे संशोधकांच्या मते, ती जमिनीवरही फिरत असे आणि झाडांवरही चढत असे. या तरुण मादीचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असावा, असे संशोधकांना वाटते. हा प्राणी सुमारे 27.4 किलो वजनाचा असावा.