

लास वेगास : अमेरिकेतील लास वेगास शहरात सध्या ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2025’ सुरू आहे. त्यामध्ये अनेक अद्ययावत उपकरणे, रोबो पाहायला मिळत आहेत. त्यापैकी ‘एरिया’ नावाच्या मानवाकृती रोबोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एआय-पॉवर्ड अँड्रॉईड असलेला हा स्त्री रुपातील रोबो अशा पद्धतीने डिझाईन केला आहे जो तुम्हाला समजून घेईल व तुमची साथसंगत करणारा सोबती होईल!
‘रिअलरोबोटिक्स’ कंपनीच्या अभियंत्यांनी हा अद्ययावत रोबो विकसित केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रोप्रायटरी एआयचे अनेक स्तर वापरले आहेत. हे स्तर या अँड्रॉईडला मानवासारखे बनवणार्या हार्डवेअरशी जोडले. त्यामधून असा मानवाकृती रोबो तयार झाला, जो मानव आणि मानवाकृती रोबो यांच्यामधील दरी मिटवून टाकू शकेल. अर्थात, या रोबोला खर्या अर्थाने ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय) एजंट म्हणता येणार नाही. मात्र, एरिया रोबो काळाच्या ओघात तुम्हाला अधिकाधिक समजून घेईल, तुमच्याविषयी जाणून घेईल. त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकेल. ग्राहकांना योग्य सेवा देणार्या व्यावसायिक रोबोपासून ते वृद्ध लोकांना सोबती होण्यापर्यंतची अनेक प्रकारची भूमिका हा रोबो करू शकतो. या शोमध्ये चक्क कासवाच्या रुपातीलही एक रोबो विकसित करण्यात आला आहे. ‘बीटबॉट’ या पूल-क्लिनिंग रोबोची निर्मिती करणार्या कंपनीने हा कासव रोबो बनवला आहे. हे यांत्रिक कासव मोठ्या जलाशयांमध्ये सोडता येईल व तिथे ते स्वच्छतेचे काम करू शकेल. या रोबोटिक कासवाला त्यासाठीची ऊर्जा सौरऊर्जेतून मिळेल. एखाद्या व्हॅक्युम क्लिनरइतक्या आकाराचा हा कासव रोबो आहे.