

वॉशिंग्टन : एकेकाळी केवळ विज्ञान कथांमधल्या काल्पनिक वाटणार्या गोष्टी आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहेत. पृथ्वीच्या पलीकडे मानवी वसाहती स्थापन करण्याच्या दिशेने ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ सारख्या अंतराळ संस्थांनी वेगाने पावले उचलली आहेत. चंद्र आणि मंगळावर दीर्घकालीन मोहिमा आखण्याचे नियोजन आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. मात्र, हे खरोखरच शक्य आहे का?
खगोलशास्त्रांनी आपल्या सूर्यमालेबाहेरही दूरवरच्या तार्यांभोवती फिरणारे असे काही ‘एक्झोप्लॅनेट’ (बाह्यग्रह) शोधले आहेत, जिथे मानवी वसाहत शक्य असू शकते. मानवाला ‘बहु-ग्रहीय प्रजाती’ बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. समर्थकांच्या मते, जर पृथ्वीवर कधी मोठे संकट आले किंवा पृथ्वी नष्ट होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर दुसर्या ग्रहावरील वसाहती मानवी अस्तित्त्व टिकवून ठेवण्यास मदत करतील. दुसर्या ग्रहावर वसाहत करणे हे दिसते तितके सोपे नाही. यासाठी अफाट कष्ट आणि प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे.
वेळेचे आव्हान : जर आपण मंगळाच्या पलीकडे जाण्याचा विचार केला, तर राहण्यायोग्य ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी हजारो वर्षांचा प्रवास करावा लागू शकतो. प्रचंड खर्च : अशा मोहिमांसाठी लागणारे आर्थिक बळ आणि संसाधने अफाट आहेत. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे, तसतसा एक मूलभूत प्रश्न समोर येत आहे. आता प्रश्न हा नाही की आपण दुसर्या ग्रहावर वसाहती स्थापन करू शकतो का? तर प्रश्न हा आहे की आपण तसे करायला हवे का? अंतराळातील या विस्ताराचे पर्यावरणावर आणि नैसर्गिक संतुलनावर काय परिणाम होतील, यावर आता तज्ज्ञांमध्ये खल सुरू झाला आहे.